अणुकरार अपघात झाल्यास नुकसानभरपाई वर तडजोड
नवी दिल्ली-पंतप्रधान मोदींचे अमेरिकेतील मॅडिसन चौकात बॉलिवूडच्या हिरोचे व्हावे तसे झोकात स्वागत झाल्याची आठवण सांगत ओबामांनी पंतप्रधानांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. ‘मोदी दोन-तीन तास झोपतात आणि उत्साहाने भरपूर वेळ काम करतात. त्यांचा हा गुण आत्मसात करायला आवडेल असेही ओबामा म्हणाले, तर मोदींनी बराक ओबामा यांच्याशी व्यक्तीगत पातळीवर चांगली मैत्री झाल्याचे सांगितले. नेत्यांची व्यक्तीगत मैत्री अनेकदा देशासाठी उपयुक्त ठरते, असेही मोदी म्हणाले.मोदी-ओबामा संयुक्त पत्रकार परिषेदत अध्यक्ष ओबामा यांनी नमस्ते आणि सगळ्यांना ‘प्यार भरा नमस्कार’ करत आपले औपचारिक भाषण केले. या भाषणात त्यांनी मोदी आणि आपल्यात झालेल्या ‘चाय पे चर्चा’चा उल्लेख केला आणि व्हाइट हाऊसमध्येही अशा कार्यक्रमाची गरज असल्याचे सांगितलेपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिकेदरम्यान झालेल्या चर्चेअंती नागरी अणुऊर्जा करारातील महत्त्वाचे अडथळे दूर झाले आहेत. भारतात या अमेरिकेच्या मदतीने चालवण्यात येणारे अणुऊर्जा प्रकल्प आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करतील. तसेच या प्रकल्पांमध्ये अपघात झाल्यास चार भारतीय विमा कंपन्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या १५०० कोटींच्या निधीतून नुकसानभरपाई दिली जाईल, असा निर्णय झाला आहे.
(राजघाट येथे बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी वाहिली महात्मा गांधी यांना आदरांजली )
राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राजघाटावरील डायरीमध्ये ओबामांनी संदेशही लिहिला. तसेच राजघाटाच्या आवारामध्ये बराक ओबामांच्या हस्ते पिंपळाचे रोप लावण्यात आले. यानंतर बराक ओबामा हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींबरोबर शिखर चर्चेसाठी उपस्थित होते
अमेरिकेच्या मदतीने भारतात चालवण्यात येणा-या अणुऊर्जा प्रकल्पांची पाहणी करण्याचे अधिकार अमेरिकेला मिळावेत अशी मागणी होत होती. अमेरिकेची ही मागणी फेटाळताना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या नियमांचे पालन करणार असल्याचे भारताने मान्य केले आहे. प्रकल्पांमध्ये अपघात झाल्यास भरपाई कोणी द्यावी यावरुन भारत आणि अमेरिकेत बरेच मतभेद होते. अखेर चार भारतीय विमा कंपन्यांना १५०० कोटींचा कायमस्वरुपी मदतनिधी उभारण्यासाठी अमेरिकेकडून ७५० कोटी रुपये आणि भारताकडून ७५० कोटी रुपये दिले जातील, अशी तडजोड झाली आहे. या तडजोडीनंतर दोन्ही देशांमधील मतभेदाची दोन प्रमुख कारणे दूर झाली आहेत. महत्त्वाचे मतभेद दूर झाल्यामुळे दोन्ही देशांनी नागरी अणुऊर्जा कराराच्या प्रशासकीय अंमलबजावणीला मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव सुजाता सिंह यांनी दिली.
याआधी संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी आणि ओबामा यांनी भारत-अमेरिका मैत्री आणखी दृढ होत असल्याचे संकेत दिले. यावेळी मोदी आणि ओबामा यांच्यात थेट हॉटलाइन सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली. आधीपासून अधिका-यांच्या स्तरावर भारत-अमेरिका यांच्यात हॉटलाइन आहे. आता देशाच्या सर्वोच्च नेत्यांच्या पातळीवर हॉटलाइन सुरू झाल्यामुळे थेट संवाद साधणे आणि महत्त्वाच्या प्रसंगी चर्चेतून तातडीने निर्णय घेणे सोपे होणार आहे.
भारत आणि अमेरिका दहशतवादाविरोधात लढण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान विमान तंत्रज्ञान सहकार्याचाही करार होत आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील गरजांचा विचार करुन मोदी सरकार अमेरिकेशी दहा वर्षांचा संरक्षण सहकार्य करार करणार आहे. सागरी संरक्षणासाठी भारत-अमेरिका एकमेकांना सहकार्य करणार आहेत. या व्यतिरिक्त सौरऊर्जा, प्रदूषण नियंत्रण, व्यवसायवृद्धी, उत्पादन आणि स्मार्ट सिटी प्रकल्प यातही अमेरिका भारताला तांत्रिक सहकार्य करणार आहे. अजमेर, अलाहाबाद आणि विशाखापट्टणम या तीन शहरांना स्मार्ट सिटी करण्यासाठी अमेरिका लवकरच भारताला सहकार्य करणार आहे.