पुणे – आपल्या देशात आणि जगात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा –हास सुरू आहे. जगात हिमाच्छादित प्रदेशातील बर्फ वितळतोय, समुद्र सीमा ओलांडत आहे, तापमान वाढत आहे. अशा या तापमान वाढीच्या संकटापासून वनराईची स्व. मोहन धारियांनी यांनी सुरू केलेली चळवळच आपल्याला वाचवू शकेल असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान, धरणात साचत असलेल्या गाळामुळे धरणांचे मरण जवळ आले असून धऱणांच्या मरणाने लाखो माणसे मरतील असा इशाराही त्यांनी दिला.
वनराईचे संस्थापक स्व. मोहन धारिया यांच्या जयंतीनिमित्त वनराई पुणे आणि वनराई फाऊंडेशनच्यावतीने एक लाख रूपये मानपत्र असा स्व. मोहन धारिया राष्ट निर्माण पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार शनिवारी ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी उल्हासदादा पवार होते. पदमभूषण डॉ. के. एच. संचेती, वनराईचे अध्यक्ष राजेंद्र धारिया, वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी, नितीन देसाई, वनराईचे विश्वस्त रोहिदास पोरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्तरादाखल आण्णा हजारे यांनी मनोगत व्यक्त करताना मत मांडले.
मला पदमश्री, पदमभूषण आणि परदेशातील अनेक मोठे पुरस्कार आजवर मिळाले पण आण्णांच्या नावाचा हा पुरस्कार सर्वात मोठा आनंद देणार आहे असे सांगून आण्णा हजारे म्हणाले, पुरस्कार कोणाच्या नावे दिला जातो आणि कोणाच्या हस्ते दिला जातो याला फार महत्व आहे. ज्यांच्यानावे हा पुरस्कार दिला जात आहे त्यांचे चारित्र्य स्वच्छ निर्मळ आणि समाजाला प्रेरणा देणारे होते आणि तसेच मला पुरस्कार देणा-यांचेही आहे, म्हणून मला या पुरस्काराने सर्वाधिक आनंद दिला आहे.
स्व. आण्णांनी सुरू केलेली वनराईची चळवळ ही त्यांची दूरदृष्टी दाखवणारी आहे असे सांगून ते म्हणाले, आज धरणे बांधली पण त्यांच्या कॅचमेंटमध्ये बेसुमार वृक्षतोड झाल्याने तेथील माती धरणांमध्ये वाहून येत आहे. रोज हजारो टन माती धरणात वाहत येत अहे. एकीकडे लोकसंख्या वाढत असताना दुसरीकडे मातीने धरणांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे या धऱणांना आज ना उद्या मरण अटळ आहे. धऱणे मेली तर लाखो लोक मरतील.
जगात तापमान वाढत असल्याने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फ वितळत चालला आहे. समुद्र सीमा ओलांडत आहे. दिल्ली आणि वर्धा येथील तापमान 47.5 अंशावर गेले उद्या तेच तापमान 50 अंशाच्या पुढे गेले तर पक्षीही जीवंत रहाणार नाहीत असे सांगून हजारे म्हणाले, विकासाच्या नावाखाली निसर्गाचा –हास होत आहे. झाडे तोडली जात असून रोज कोटी लिटर पेट्रोल, डिझेल, रॉकेल जाळून कार्बनडाय ऑक्साइड हवेत सोडला जात आहे. पण तो शोषून घेणा-या झाडांची संख्या मात्र कमी होत असल्याने प्रदूषण वाढत आहे. या सगळ्याचा दूरगामी विचार करूनच स्व. आण्णां धारियांनी वनराईची चळवळ सुरू केली. हीच चळवळ जागतिक तापमान वाढीच्या संकटापासून वाचवू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्व. मोहन धारिया यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले, मी स्वत:चा चार भिंतीतील प्रपंच मांडला नाही पण समाजाचा मोठा प्रपंच मांडला. या उलट आण्णा धारियानी चार भिंतीतील प्रपंचही मांडला आणि त्याच बरोबर मोठा समाजाचाही प्रपंच मांडला आणि राजकारणातून सत्या आणि न्यायासाठी बाजूला होऊन त्यांनी सामाजिक चळवळ उभी केली. गावांचा विकास करणे म्हणजे मोठ्या इमारती किंवा पक्के रस्ते बांधणे नव्हे तर सामाजिक बांधिकलीची जाण असणारी गावागावात माणसं उभी करून आदर्श गाव करणे आणि हेच काम आण्णांनी सुरू केले आहे. केवळ खासदार फंडातून पैसे खर्च करून गावे आदर्श होणार नाहीत किंवा उभी रहाणार नाहीत. गावे ही स्व. आण्णा धारियांच्या चळवळीतूनच उभी रहातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजय कुवळेकर म्हणाले, महाराष्ट्राला आण्णासाहेब कर्वे. कर्मवीरआण्णा भाऊराव पाटील, आण्णा साहेब पाटील, एस. एम जोशी उर्फ आण्णा अशा आण्णांच्या उज्वल परंपरेत बसणारी ही दोन नावे म्हणजे स्व. आण्णा धारिया आणि आण्णा हजारे आहेत. आजचा धारियांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार म्हणजे सतप्रवृत्तीचा पुरस्कार असून तो आण्णा हजारे यांना दिला जातो म्हणज सतप्रवृत्तीच्या अविष्काराला दिला जात आहे. आण्णा हजारे यांनी व्रतस्थ राहून सत प्रवृत्तीचा अंकूश सत्ताधिशांवर ठेवण्याचे काम ते करत आहेत तर आण्णा धारियांनी सतशक्ती संघटित करण्याची काम केले. त्यांनी सत्ता उपभोगली पण सत्तेच्या मागे ते कधी गेले नाहीत. या दोन महान व्यक्तीमत्वांच्या मधे मी असणे म्हणजे सामान्य माणसांचा प्रतिनिधी म्हणून उभा आहे.
यावेळी कुवळेकर यांनी आण्णा हजारे यांच्या सोबत घेतलेले काही अनुभव सांगितले.ते म्हणाले, एकेवेळी आत्महत्येच्या विचाराने आण्णा हजारे रेल्वे स्टेशनवर बसले होते आणि त्यावेळी त्यांना समोरच्या स्टॉलवर स्वामी विवेकानंदांचा पुस्तक बघायला मिळाले. ते पुस्तक वाचल्यानंतर आण्णांनी आत्महत्येचा विचार दूर सारून समाजाच्या हितासाठी उभे रहाण्याचा निश्चय केला आणि त्यांची पुढील वाटचाल ही आळंदीच्या उपोषणापासून सुरू झाली. आण्णांनी समाजात जागृती करण्याचे काम केले आणि त्याच कामामुळे सत्ता परिवर्तन झालेलेही आपण बघितले आहे. ही त्यांची खरी ताकद आहे. ज्ञानेश्वरी वाचणे किंवा यादवबाबा मंदिरातील त्यांचा मुक्काम ही त्यांची उर्जा मिळवण्याची स्थान असल्याचेही कुवळेकर यांनी नमुद केले.
अध्यक्ष उल्हास पवार म्हणाले, गेली चाळीस वर्षे मला आण्णा धारिया आणि आण्णा हजारे यांचा सहवास लाभला आहे. त्यांच्या बरोबर संवाद करण्याची संधी मिळाली. हजारे यांच्या पहिल्या उपोषणाच्या वेळचा अनुभव सांगून पवार म्हणाले, केवळ निसर्गाचाच नाही तर सध्या समाजिक पर्यावरणाचाही –हास होत आहे. आण्णा हजारे यांनी आण्णा धारिया यांच्या सल्ल्यानुसार संघटन, प्रबोधन आणि नंतर आंदोलन केले आणि त्याच्या दृष्य परिणामांचे साक्षिदार आहोत. मत परिवर्तन त्यांनी करून दाखवले. पण ते कसे शक्य झाले तर परिवर्तन या शब्दातील वर्तन या शब्दाला आण्णा हजारे यांनी महत्व दिले आणि तेच इतरानी सांगितले. म्हणूनच परिवर्तन त्यांच्या आंदोलनामुळेच शक्य झाले.
स्व. मोहन धारिया यांच्या प्रतिमेला पुष्पहार आण्णा हजारे यांनी अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले तर आभार प्रदर्शन करताना राजेंद्र धारियांनी आण्णांच्या जयंतीचा दिवस हा जल वन दिन म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त आज शंभर गावांमध्ये प्रभार फे-या, ग्राम सफाई, व्याख्याने आणि शिबीर असे कार्यक्रम झाल्याचे सांगितले.