पुणे- सध्या नोक-यांची संख्या कमी असल्याने व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांनी (व्हीटीपी) बेरोजगार तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन सामाजिक बांधीलकी जपावी, असे आवाहन येरवडा कारागृहाचे अधीक्षक उमाजी पवार यांनी केले. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्राचे उपसंचालक शरद अंगणे, उद्योजक दौलत बाफना, जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, केंद्राचे सहायक संचालक विजय कानिटकर, कौशल्य विकास अधिकारी संगीता चौधरी आदी उपस्थित होते.
कौशल्य विकास सोसायटी मार्फत नोंदणीकृत झालेल्या व ज्या संस्थांनी उमेदवारांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले, जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण केल्या अशा पाच संस्थांचा गौरव करण्यात आला. इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस प्रा. लि;, विमाननगर, ऑल इंडिया इन्स्टीट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, कोथरुड, उन्नती सामाजिक संस्था, सांगवी, संकल्प एज्युकेशन सोसायटी, धनकवडी आणि निरा एज्युकेशन सोसायटी, निरा या संस्थांचा स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. केंद्राचे उपसंचालक शरद अंगणे यांनी जागतिक कौशल्य दिनाचे महत्त्व विशद केले. ‘स्कील इंडिया’ ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून यामध्ये व्हीटीपींना काम करण्यास मोठी संधी आहे. राज्यातील मनुष्यबळ अधिकाधिक कौशल्यपूर्ण झाल्यास विकासाची गती आणखी वाढेल, असे ते म्हणाले.
केंद्राचे सहायक संचालक विजय कानिटकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन हिंमत टाकळकर तर आभार प्रदर्शन इनूजा शेख यांनी केले.

