नवी दिल्ली-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जे मनात आहे, ते सर्व स्पष्ट आहे. सत्ता येते,सत्ता जाते. मात्र नाते आणि मैत्री कायम राहायला हवी, हेच सांगण्यासाठी आम्ही राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. असा दावा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य यांनी काल राहुल गांधी आणि आज केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडणुकांत EVM, मतांचा फ्रॉड झाल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला .
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांनी मागील दहा वर्षात दिल्लीत जे काम केले, ते दिल्लीतील सर्व जनतेला माहिती आहे. मात्र, ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये निवडणूक आयोगाचा मोठा हात आणि आशीर्वाद होता. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाचे आभार मानायला हवे. काल राहुल गांधी आणि आज अरविंद केजरीवाल यांच्याशी माझी चर्चा झाली. इंडिया गट बंधन असो किंवा आम्ही सर्व घटक पक्ष. आमची पुढची स्टेप काय असावी? यावर चर्चा होणे आवश्यक आहे. कारण आपली लोकशाही पारदर्शक राहिलेली नसल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. जनतेचा आणि माध्यमांचा आवाज आम्ही बुलंद करत राहणार आहोत. रस्त्यावरची लढाई लढावी लागली तर ती देखील लढण्याची आमची तयारी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील निकालाचे विश्लेषण प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने करत असतो. मात्र आमच्याकडून जे नाते आहे, जी मैत्री आहे, ती कायम राहणार असल्याचे ते म्हणाले. अनेक मतदारसंघात मतदारांची नावे यादीतून काढण्यात आली. त्यावर विचार करणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. जेव्हा आमच्या भेट होतात, त्यावेळी निवडणुकीचे निकाल यावर आमच्यात चर्चा होतच असते. याचा अभ्यास केल्यानंतर वाढलेले मतदार आणि शेवटच्या एका तासात झालेले मतदान, याच्या व्हिडिओ फुटेजवर बोलायला निवडणूक आयोग तयार नाही. याच पॅटर्न महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली सगळीकडे दिसून येत असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
हे देश हिताची मुद्दा आहे आणि त्यामुळेच आम्ही सर्व पक्ष एकत्र येत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या विरोधात आम्ही लढत राहणार आहोत आणि धोरणात्मक बदल करत राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने देखील पक्षाचे नेते संजय सिंह यांनी आदित्य ठाकरे यांनी पुढे केलेल्या मैत्रीच्या हाताचे स्वागत केले आहे.