माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या “चाणक्य मंडल परिवार’च्या वारजे येथील नूतन वास्तूचे उद्घाटन नोबेल विजेते तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर दुपारी दलाई लामा यांच्याशी खुला संवाद कार्यक्रमाचे “गणेश कला क्रीडा सभागृह’ (स्वारगेट) येथे आयोजन करण्यात आले होते .
“जागतिक शांतता प्रस्थापित करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. इथून पुढे बंदूकीच्या धाकावर जग जिकंता येणार नाही, हृदय जिंकूनच जग जिंकता यईल. तसेच शिक्षण पद्धतीमध्ये पारंपारीक मुल्यांबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मिलाफ करणे आवश्यक आहे. “चाणक्य मंडल’ ने या संदर्भात सुरू केेलेल्या शैक्षणिक चळवळीने मी अत्यंत प्रिअभावित झालेलो आहे’, असे प्रतिपादन नोबेल विजेते तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी बुधवारी पुणे येथे केले.
माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश धर्माधिकारी यांनी स्थापन केलेल्या “चाणक्य मंडल परिवार’च्या वारजे येथील नूतन वास्तूचे उद्घाटन नोबेल विजेते तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नामफलकाचे आणि कोनशीलेचे अनावरण झाले. आज दि. 31 डिसेंबर रेाजी सकाळी 10 वाजता “चाणक्य मंडल’ चे संचालक अविनाश धर्माधिकारी, सौ. पूर्णा धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत वारजे महामार्गावरील चाणक्य मंडलच्या नवीन वास्तूत हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना दलाई लामा म्हणाले, “चाणक्य मंडल’ ची मानवतेला समर्पित “ज्ञानमंदीर’ ही संकल्पना मला आवडली. आधुनिक ज्ञान, जागतिक भान ठेवून राष्ट्रीय चारित्र्याचे प्रतिभावान विद्यार्थी, कार्यकर्ते, अधिकारी घडविण्याचा “चाणक्य मंडल’चा संकल्प सिद्धीस जाईल. इथून पुढे शिक्षणात पारंपरिक मूल्ये, संस्कृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा मिलाफ करायला लागणार आहे. आताचे शिक्षक पैशाच्या मागे धावत आहेत. मात्र, “चाणक्य’ ने शिक्षणात जी मूल्ये आणली त्याने मी प्रभावित झालो आहे.
सर्वंकष विचार करून ज्ञानाधारित स्वयंसेवी प्रयत्नातूनच उद्याचे आनंदी जगाची उभारणी करता येणार आहे.
हिंसेने धाकाने जग नियंत्रित करता येत नाही. हदये जिंकूनच जग जिंकता येईल. हे सर्वांना पटलेले आहे. चीनमध्येसुद्धा याबाबत बोलले जात आहे. चीनसुद्धा बदलत आहे. चीनची बाजारपेठ सर्वांना खुली करण्यात येत आहे. आर्थिक आणि अन्य उदारीकरणाच्या चीनच्या धोरणाने तिबेटी संस्कृतीचे रक्षण करण्याच्या मागणीला सर्व मान्यता मिळत आहे. तिबेट स्वतंत्र होऊ शकणार नाही. मी स्वत: ती मागणी करीत नाही, मी राजकीयदृष्ट्या निवृत्तही झालो आहे. मात्र, चीन बदलत आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पण चीनने त्या देशात उपलब्ध असलेले अधिकार तरी तिबेटींना द्यायला हवेत.
जे स्वातंत्र्य चीनच्या इतर भागात उपलब्ध आहे. ते तरी तिबेटींना उपलब्ध व्हायला हवे. तिबेटी लॉयल्टी, अध्यात्मिक स्फूर्ती चीनला धाकाने, अथवा विकत मिळविता येणार नाही. सत्याची ताकद ही बंदुकीच्या ताकदीपेक्षा अधिक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
सत्ता, संशय, हव्यास इथून पुढे चालणार नाही. अहिंसा, एकात्मता, सर्व धर्म समभाव, निर्भयता, ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. 3 हजार वर्षांपासून ही मूल्ये नांदत आहेत. यावर विश्वास ठेवूनच मानवता बळकट होणार आहे.
देवावर फार जबाबदारी टाकतो, ते चुकीचे आहे. स्वत:वर विसंबून चांगली कामे हाती घेतली पाहिजेत.
भारतात शिया मुसलमान जितके सुरक्षित राहतात. तितके पाकिस्तानातही राहू शकले नाहीत असा उल्लेखही त्यांनी केला. भारत हा धार्मिक लोकांचा देश आहे. मात्र, वाईट कृत्य करताना भ्रष्टाचार करताना धार्मिक शिकवणूक पाळली जात नाही. याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे फक्त प्रार्थना उपयोगी पडणार नाही, तर प्रयत्नांचीही गरज आहे.
बौद्धधर्मीय सुद्धा आता 21 व्या शतकातील बुद्ध बनले पाहिजे, असेही ते म्हणाले.
जागतिक शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, असे सर्वांनाच वाटते. पण जागतिक शांतता प्रस्थापित करा असे म्हणताना एक बोट आपल्याकडेही असले पाहिजे. स्वत: त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तशी प्रेरणा प्रत्येकाचा मनात निर्माण व्हायला हवी.
सौ. पूर्णा धर्माधिकारी यांनी प्रास्ताविकात “चाणक्य मंडल’ ची वाटचाल विषद केली. “राष्ट्रीय चारित्र्य असणारे कार्यक्षम कार्यकर्ता – अधिकारी घडविण्यासाठी “चाणक्य मंडल’ची स्थापना झाली. 16 वर्षांत हजारो कार्यकर्ता अधिकारी राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवेत आहेत प्रशासनाव्यतिरिक्त जीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रात “चाणक्य मंडल’ चे विद्यार्थी योगदान देत आहेत’. “चाणक्य’ च्या इमारतीला अधिक मजले बांधायची परवानगी देणे राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. ती त्यांनी द्यावी.’ असेही त्या म्हणाल्या.
अविनाश धर्माधिकारी म्हणाले, “दलाई लामा यांच्या हस्ते मानवतेला समर्पित या ज्ञान मंदिराचे लोकार्पण होणे, ही अत्यंत आनंददायक आणि औचित्यपूर्ण घटना आहे. त्यांचा आशीर्वाद मिळाल्याने “चाणक्य मंडल’ चा ध्येयवाद अधिक बळकट होणार आहे. भारताचा वैश्विक वारसा असलेल्या विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचारावर उभे राहिलेले हे ज्ञान मंदिर आहे, आणि त्याचे लोकार्पण जगद्गुरू दलाई लामा यांच्या हस्ते मानवतेला अर्पण केले जात आहे. हा नव्या पर्वाचा आनंददायक प्रारंभ आहे. विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचारावर आधारीत अत्याधुनिक विद्यापीठ उभे रहावे ही इथुन पुढची दिशा असेल’.
डॉ. श्रीनंद बापट यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाला व्यासपीठावर “चाणक्य’चे विश्वस्त डॉ. भीष्मराज बाम, डॉ. भूषण केळकर, तसेच अनंतराव गोगटे, माधव जोगळेकर हे उपस्थित होते. तर उपस्थितांमध्ये अविनाश धर्माधिकारी यांचे माता-पिता, तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, डॉ. दीपा लागू, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, चंद्रकांत दळवी, ज्ञानप्रबोधिनी संचालक गिरीश बापट, विश्वंभर चौधरी, राजीव खांडेकर, डॉ. राजा दांडेकर, डॉ. श्रीकांत बहुलकर, वि. दा. कराड, वा. ना. अभ्यंकर, आमदार मेधा कुलकर्णी, वेदाचार्य घैसास गुरूजी, शीतला बापट इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सौ. पूर्णा धर्माधिकारी यांनी केले.
मानसरोवर तसेच भारतातील 27 नासांचे जल चाणक्य मंडल च्या अधिकारी बनलेल्या विद्यार्थ्यांनी दलाई लामांसमोर पवित्र कलशात जमा केले. दलाई लामा यांनी इमारतीचे उद्घाटन म्युरलचे उद्घाटन केले. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे ही दिली.
नंतर “खुला संवाद’ कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. तेथे दलाई लामा यांना ओमकार शिल्प प्रतिमा भेट देण्यात आली.
बाएफ जवळ स.क्र. 118/2 ए येेथे चाणक्य मंडलची पर्यावरणपूरक, सौरउर्जेवर चालणारी, रेन हार्वेस्टिंगसहीत अनेक वैशिष्ट्ये असलेली अत्याधुनिक वास्तू उभारण्यात आली आहे. येथे स्पर्धा परीक्षा व इतर अभ्यासक्रमांकांची सुविधा, ग्रंथालय व गुरूकूलवर आधारीत निवास व्यवस्था आहे.
कार्यक्रमादरम्यान स्मिता देशपांडे (साहाय्यक संपादक, “जडणघडण’ मासिक), शशांक देवगडकर (खठड 2009, बडोदा), विशाल सोळंकी (खअड 2005, जिल्हाधिकारी, जोरहाट, आसाम) या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते सादर केली.
जानेवारी 1996 रोजी अविनाश धर्माधिकारी यांनी आयएएस सेवेचा राजीनामा दिल्यानंतर दि.10 ऑगस्ट 1996 रोजी “चाणक्य मंडल’ ची स्थापना किरण बेदी यांच्या हस्ते झाली. सदाशिव पेठेतील सध्याच्या वास्तूचे उद्घाटन पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या हस्ते दि. 5 ऑक्टोबर 1998 रोजी झाले होते. त्यानंतर 19 वर्षांनी वारजे येथे 8 मजली शैक्षणिक वास्तुच्या लोकार्पणाचा योग जुळून आला.