पुणे :
पुणे विद्यापीठ रस्त्याजवळील ‘ वैकुंठभाई मेहता नेशनल इन्स्टीटयुट ऑफ को-ऑपरेटिव्ह मेनेजमेंट ‘ मधून रस्त्यासाठी २ हजाराहून अधिक झाडे कापण्यास नागरिकांचा ,पर्यावरण प्रेमींचा विरोध असून या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला . आज सकाळी (रविवारी ) परिसरातील नागरिक ,पुण्यातील पर्यावरण प्रेमी संस्थांचे प्रतिनिधी ,वृक्ष प्रेमी यांची बैठक झाली . त्यात हा निर्णय घेण्यात आला .
पालिकेला निर्णय रद्द करण्यास भाग पाडणे ,ऑन लाईन पिटीशन ,लोकशाही दिनी तक्रार ,विद्यापीठ चौकात निदर्शने -आंदोलने ,टेकडीवरील संभाव्य वन्य जीवन नुकसानीबद्दल वन विभागाकडे तक्रार करणे , अशा मार्गांचा विचार करण्यात आला . या रस्त्यावरील वृक्षांची गणना करण्याचे कामही नागरिक हाती घेणार आहेत .
मेहता इन्स्टीटयुट ते जुना मुंबई रस्ता जोडणारा छोटा रस्ता टेकडीला लागून मेहता इन्स्टीटयुटमधून जातो आणि तो पालिकेच्या ताब्यात नाही . या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी स्थायी समितीने अडीच कोटी मंजूर केले आहेत .
‘रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पालिका एका राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यातील हजारो वृक्ष तोडण्याचा निर्णय घेते ,वृक्ष प्राधिकरणाकडे माहिती देत नाही ,टेकडी फोडण्याचा विचार करते ,त्यासाठी तरतूद करते हे अत्यंत चुकीचे असून नागरिक प्राण पणाने त्याला विरोध करतील . यापूर्वी पालिकेच्या ताब्यात रस्ता नसताना तो सिमेंट चा कसा करण्यात आला ? असेही विचारण्यात आले . ‘ . स्थानिक नगरसेवक राजू पवार यानाही नागरिकांच्या तीव्र भावनां सांगण्यात आल्या .
या रस्त्याला लागून असलेल्या टेकडीवर विविध पक्षी ,मोर ,प्राणी तसेच २८ प्रकारच्या वृक्षांची झाडी आहे . ही परिसंस्था रुंदीकरण आणि टेकडी फोडीने धोक्यात येणार आहे
भोसले नगर मोहल्ला समिती चे पदाधिकारी सुभाष भिशीकर ,हरीश हुकमानी ,व्ही एन राव ,वृक्ष प्रेमी विनोद जैन ,वृक्ष प्राधिकरण सदस्य अमेय जगताप ,’ सेव्ह पुणे हिल्स इनीशिएटिव्ह ‘ चे अध्यक्ष दीपक बिडकर ,माधवी राहिरकर यावेळी उपस्थित होते