नवी दिल्ली –आम आदमी पार्टी (आप)च्या राष्ट्रीय परिषदेच्या प्रचंड गदारोळात झालेल्या बैठकीत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, आनंद कुमार आणि अजित झा यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठक सुरू असताना मध्येच प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव बाहेर आले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, प्रशांत भूषण म्हणाले की, बैठकीमध्ये गुंडांना बोलावण्यात आले होते. काही आमदारांनीही गुंडागर्दी केली. कालच्या स्टींगमध्ये केजरीवाल जे लाथ मारून बाहेर काढण्याबाबत बोलत होते, ते त्यांनी आज करून दाखवले. बैठक पूर्णपणे खोटी आणि सुनियोजित असल्याचा आरोपही प्रशांत भूषण यांनी केला. योगेंद्र यादव म्हणाले, मीटिंगदरम्यान बाऊंसर्सनी त्यांना ओढत बाहेर काढले. केजरीवाल यांनी भाषणादरम्यान गोपाल राय यांना राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्ष होण्यास सांगितले. पण त्यादरम्यानच मनीष सिसोदिया यांनी वोटिंग सुरू केली. अरविंद केजरीवाल यांच्या भाषणा दरम्यानच कपिल मिश्र आणि इतर काही आमदारांनी गद्दारांची हकालपट्टी करा अशा घोषणा सुरू केल्या. केजरीवाल यांनीही संपूर्ण भाषणात आमच्यावर हल्ला केला. ते बैठकीच्या अध्यक्षांचे भाषण नव्हते, असे यादव म्हणाले.
हा प्रकार म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी केला आहे. बैठक पूर्णपणे एकांगी झाली, त्यात आपल्याला कोणत्याही मुद्यावर बोलू दिले नाही, असा आरोपही या दोघांनी केला आहे. बैठकीत गुंडांना बोलवण्यात आले होते. बाऊन्सर्सनी सहकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान त्यापूर्वी राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीला संबोधित करताना पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला चढवला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केजरीवाल म्हणाले की, मी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्याबरोबर काम करू शकत नाही. आता तुम्हीच मला सांगा की मी काय करायला हवे?
राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीपूर्वी शनिवारी पक्षाचे नेते संजय सिंह केजरीवाल यांचा बचाव करताना म्हणाले की, केवळ एका व्यक्तीला लक्ष्य केले जात आहे. यादव आणि भूषण यांनी दिल्लीत आम्हाला पराभूत करण्यात काहीही कसर सोडली नाही हे मी स्वतः सांगतो. तरीही केजरीवाल त्यांना काढण्याची भाषा करत नाहीत. ते तर म्हणतात तुम्ही पक्ष चालवा मी माझे आमदार घेऊन बाहेर पडतो.
राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीपूर्वी शनिवारी पक्षाचे नेते संजय सिंह केजरीवाल यांचा बचाव करताना म्हणाले की, केवळ एका व्यक्तीला लक्ष्य केले जात आहे. यादव आणि भूषण यांनी दिल्लीत आम्हाला पराभूत करण्यात काहीही कसर सोडली नाही हे मी स्वतः सांगतो. तरीही केजरीवाल त्यांना काढण्याची भाषा करत नाहीत. ते तर म्हणतात तुम्ही पक्ष चालवा मी माझे आमदार घेऊन बाहेर पडतो.