पुणे – माझ्या आईवडिलांचा नुकताच पुण्यात सत्कार झाला. ते अशिक्षित असल्याने मला नऊ ठिकाणी शिक्षण घ्यावे लागले. सध्या बदलत्या काळाबरोबरच शिक्षण क्षेत्रात होणा-या बदलांमुळे पालकांनीही जागरूक राहून आपल्या मुलासाठी योग्य करीयर निवडण्यात सहभाग घेतला पाहिजे. आवडते करीयर मुलांना मिळाले की ते पुढे नक्कीच चांगले नागरीक होतील आणि हाच चांगल्या समाजनिर्मितीचा पाया आहे त्यामुळे मुलांच्या करीयर निवडीत पालकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज येथे केले.
पुणे संस्कृती वैभव ट्रस्ट आणि ड्रीम्स टेलीफिल्म प्रा. लिमिटेड यांनी आयोजित केलेल्या 16 व्या दोन दिवसांच्या करीयर महोत्सवाचे उदघाटन बालगंधर्व रंगमंदीर येथे शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार वंदना चव्हाण, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झग़डे, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, पुणे मनपाच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ, उपाध्यक्ष नुरूद्दीन सोमजी, ज्येष्ठ विधीज्ञ भास्कररावा आव्हाड, पुणे एज्युकेशन अकॅडमीचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे, अहमदनगर मित्रमंडळाचे अध्यक्ष उत्तमराव करपे, शिक्षण मंडळाच्या शिक्षणाधिकारी मिनाक्षी राऊत, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक संजय चोरडिया, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, कुमार बिल्डर्सच्या मुख्यकार्यकारी अधिकारी कृती जैन, प्रविणमसालेवाले – सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडिया, गायत्री चौधरी आणि रवी चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून महोत्सवाचे उदघाटन केले. यावेळी अहमदनगर मित्र मंडळाच्यावतीने भास्करराव आव्हाड आणि करपे यांनी राम शिंदे यांचा खास सत्कार केला.
राम शिंदे म्हणाले, आमच्यावेळी करीयर निवडणे वगैरे काही नव्हते. पण आज जेव्हा महोत्वातील स्टॉल्सचे उदघाटन केले त्यावेळी मला माझ्या बारावीत आणि दहावीत असलेल्या मुलींची आठवण झाली. त्यांच्यासाठी किमान दोन तास याच प्रदर्शनात घालवून महिती घ्यावी असे वाटते. कारण आज शिक्षणक्षेत्राचा व्याप मोठा झालेला असल्याने अनेक प्रकारच्या करीयरच्या संधी तरूणांच्या समोर आहेत. त्याची महिती स्वताने मिळवायची म्हटले तर त्यातच वर्ष निघून जाईल. त्यामुळे इथे प्रदर्शनात जी महिती उपलब्ध आहे ती आपल्या मुलांसाठी पालकांनी घेऊन त्यांच्या करीरय निवडीत सहभागी होऊन मुलांना त्यांच्या आवडीचे करीयर मिळवून द्यावे.
ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड म्हणाले, आमच्या शैक्षणिक काळात फक्त पास की नापास इतकंच महत्वाचे होते. त्यामुळे करीयर म्हणजे काय हे महितीसुद्धा नव्हते. पण ते दिवस राहिलेले नाहीत या क्षेत्रातही स्पर्धा असल्याने करीयर निवडण्याला महत्व प्राप्त झाले आहे. खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या गेली पंधरा वर्षे हा उपक्रम सुरू आहे. त्यात किती बदल होत गेले हे मी बघितले आहेत. तसेच दरवर्षी नव्याने निर्माण होणारी करीयर क्षेत्रांची महिती मुलांना, पालकांना एका छताखाली मिळणे गरजेचे झाले असल्यानेच हा करीयर महोत्सव महत्वाचा आहे.
प्रास्तविक करताना महोत्सवाचे संचालक रवी चौधरी म्हणाले, पंधरावर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली तेव्हा त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही पण आज अशाच प्रकारचे महोत्सव अनेक ठिकाणी भरत आहेत यावरूनच याचे महत्व किती वाढले आहे हे समजते, यंदाच्या करीयर महोत्सवाची महिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी संयोजन समितीने व्हॉटसअप, फेसबुक, व्टीटर अशा नव्या तंत्रज्ञान व सोशल मिडियाचे मदत घेतली. तसेच या महोत्वात येणा-या विद्यार्थी पालकांना नव्या काळाच्या बर्गर, पिझ्झा अशा पदार्थांची ओळख करून देण्याचाही प्रयत्न कॅफे वॉरच्या माध्यमातून केला आहे.
यावेळी सौरभ गाडगीळ, विशाल चोरडिया आणि कृती जैन यांना करीयर जनरेशन नेक्स्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याच बरोबर महापालिकेच्या बाबूराव सणस शाळेतील विद्यार्थीनी सुवर्णा जगदाळे आणि राजीव गांधी इलर्निंग स्कूलचा विद्यार्थी विशाल म्हात्रे यांचा खास गौरव करण्यात आला. या दोघांनीही बारावीच्या परिक्षेत 85 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. उदघाटन समारंभानंतर पुरस्कार विजेत्यांसह महेश झगडे आणि वंदना चव्हाण यांच्या प्रकट मुलाखती राजेश दामले यांनी घेतल्या. मुलाखतीनंतर दीर्घायु या करीयर विशेषांकाचे प्रकाशन महेश झगडे यांनी केले.
या मुलाखतील सौरभ गाडगीळ यांनी येत्या दोन वर्षात पीएनजीच्या पन्नासपेक्षा जास्त शाख सुरू करायच्या असल्याचे सांगून, पीएनजीचे पब्लिक इश्यू काढण्याचे धेय्य ठेवले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर 1999 नंतर सोन्याचांदीच्या व्यापाराचे रूपांतर कॉर्पोरेट उद्योगात कसे होत गेले हे सांगितले. कृती जैन यांनी कूल (कुमार अर्बन डेव्हलपमेंट लिमिटेड)ची संकल्पना स्पष्ट केली. उद्योगाची सीइओ पर्यंतचा प्रवास कसा झाला, वडिलांची साथ कशी मिळाली, यापुढे कुमार तर्फे बदलत्या काळानुरूप कशा प्रकारच्या सिटी किंवा कॉलनीज उभ्या करण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. विशाल चोरडिया यांनीही घरचा व्यवसाय असला तरी कशा प्रकारे सर्व कामाची महिती घेतली हे सांगितले आणि यापुढ फक्त मसालाच्या व्यवसायावर अवलंबून न रहाता अन्न प्रक्रिया उद्योगात फूड इंडस्ट्रीमध्ये काम करणार असल्याचे सांगितले. पीएमआरडीएचे मुख्यकार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी पीएमआरडीए नेमकी काय काम करणार असल्याचे स्पष्ट केले. खासदार वंदना चव्हाण यांनी राजकारण हे करीयरही चांगले आहे पण त्यात य़ेऊ इच्छिणा-या मुलांना त्यांच्या घरच्यांनी भक्कम पाठिंबा देण्याची गरज आहे असे सांगितले.
या महोत्सवातील प्रदर्शनात डी वाय पाटील कॉलेज, सिंहगड इन्स्टिट्यूट, सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, अम्ब्रोशिया, रायसोनि इन्स्टिट्यूट, सिद्धांता आणि एमआयटी कॉसेज, यासह अनेक नामवंत शिक्षण संस्थांनी स्टॉल्स येथे लावले आहेत. पुरंदरे हॉस्पिटॅलिटीच्या सहकार्यांना शहरातील 60 कॅफेजची स्पर्धा येथे असून या स्टॉल्सवर बर्गर, पिझ्झा, हॉट डॉग्ज, सॅंडविचेस अशा पदार्थांची प्रत्यक्षिके करून दाखवण्यात येत आहेत. या शिवाय प्रवेशासाठी लागणारे आधार कार्ड काढणे, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, डोमेसाइल, जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखलाही या महोत्सवात काढून देण्याची सुविधा संयोजकांनी दिली आहे. येथे येणा-या विद्यार्थ्यांसाठी 1 ते 2 मिनिटांची आय़ लव्ह पुणे या विषयावर लघुपट तयार करण्याची स्पर्धा प्रथमच घेण्यात आली आहे. या महोत्सवाचे संयोजन गायत्री चौधरी, प्रा. प्रताप बामणे, प्रा. भुवनेश कुलकर्णी, सिद्धेश पुरंदरे आणि दशरथ कुलधरन यांनी केले आहे.
उदघाटनानंतर दिवसभरात विविध विषयांच्या प्राध्यपकांची व्याख्याने झाली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. महोत्सवात उद्या रविवारी सकाळी 9 पासून व्याख्याने सुरू होणार असल्याचे महोत्सवाचे संचालक रवी चौधरी यांनी सांगितले.