मुंबई : हज यात्रेसाठी मुंबई येथून जाणाऱ्या पहिल्या विमानाला अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे यांनी हिरवा झेंडा दाखविला. गुरुवार पहाटे पाचच्या सुमारास छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र हज कमिटीच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. हज यात्रेसाठी निघालेल्या 340 यात्रेकरुंना धार्मिक ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन श्री.खडसे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य हज समितीचे अध्यक्ष इब्राहिम शेख, ऊर्दू अकादमीचे कार्याध्यक्ष रौफ खान, माजी मंत्री नसीम खान, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान ऊर्फ अमीर खान, अल्पसंख्याक विभागाच्या सह सचिव अैनुल अत्तार आदी उपस्थित होते.
हज यात्रेसाठी जाणे हे प्रत्येक मुस्लीम बांधवाचे स्वप्न असते. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे निर्मुलन व्हावे आणि देशात सुख, शांती नांदावी यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही श्री.खडसे यांनी यावेळी यात्रेकरुंना केले.