नाशिक / नांदगाव : राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असताना काँग्रेसनेही मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे चेहरा नसून, मोदींच्या करिष्म्यावरच राज्यातील भाजप अवलंबून असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करत मोदींच्या कितीही सभा घ्या, तरीही काही फरक पडणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. स्वबळावर येणार नसल्याने भाजपने युतीची भाषा सुरू केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
काँग्रेसच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या आज (दि.५) जिल्ह्यात हरसूल आणि नांदगाव येथे सभा झाल्या. इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार निर्मला गावित यांच्या प्रचारार्थ हरसूल येथे झालेल्या सभेत चव्हाण बोलत होते. मोदींच्या आडून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघत आहे. यांना काय आदिवासी, शेतकर्यांचे दु:ख कळणार, असा सवाल उपस्थित करीत मोदींच्या सभा होतील, ते भुरळ पाडतील, यावर राज्यातील भाजप अवंलबून आहे; मात्र मोदींच्या सभांना भुलायला जनता खुळी नाही. स्वबळावर येणार नसल्याची जाणीव झाल्याने गडकरींनी युतीची भाषा सुरू केली आहे. मुंबईचे उद्योग अहमदाबाद येथे नेऊन मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा मोदींचा डाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला. निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीने राज्यात राष्ट्रपती राजवट लावून भाजपला अप्रत्यक्ष सत्ता दिली आहे, याचा जाब जनतेने राष्ट्रवादीला विचारावा, असेही चव्हाण यांनी सांगितले. खिचडी सरकार येण्यापेक्षा काँग्रेसला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सभेला प्रदेश सरचिटणीस रमेश श्रीखंडे, माजी आ. निर्मला गावित, जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपतराव सकाळे आदी उपस्थित होते.