अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हार्सिटीच्या गटाचे नेतृत्व आनंद ललवाणीकडे
पुणे– अमेरिकेतील प्रसिद्ध दि नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाने नुकतेच व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅन्ड येथून इक्विसॅट या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील ब्राऊन युनिव्हार्सिटीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. अभिमानाची बाब म्हणजे या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे नेतृत्व हे पुण्याच्या आनंद ललवाणी या 22 वर्षीय विद्यार्थ्याने केले आहे. याबरोबरच अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या आणि नासाने प्रक्षेपित केलेल्या अशा प्रकारच्या प्रकल्पातील गटाचे नेतृत्व केलेला तो पहिला भारतीय ठरला आहे.
एका गिफ्ट बॉक्स इतकाच जवळजवळ 4 इंच एवढा या उपग्रहाचा आकार असून नासाच्या क्यूबसॅट लॉन्च इनिशिएटिव्ह अंतर्गत ब्राऊन स्पेस इंजिनिअरिंग अर्थात बीएसई या गटाने त्याची निर्मिती केली आहे. दि. 20 मे रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. गेल्या सात वर्षांपासून ब्राऊन युनिव्हार्सिटीचे विद्यार्थी या प्रकल्पावर काम करीत होते. विशेष म्हणजे एखाद्या उपग्रहाच्या निर्मितीसाठी किमान 50 हजार ते 1 लाख डॉलर्स इतका खर्च येत असताना या विद्यार्थ्यांनी तो केवळ चार हजार डॉलर्स किमतीत विकसित केला आहे.
आनंद ललवाणीने ब्राऊन युनिव्हार्सिटीमध्ये इंजिनिअरिंग फिजिक्स या विषयात नुकतीच पदवी पूर्ण केली आहे. आनंदची एरोनॉटिक्समधील आवड लक्षात घेत ब्राऊन स्पेस इंजिनिअरिंगच्या संघात युनिव्हर्सिटीत दाखल झाल्यापासूनच त्याची निवड करण्यात आली होती. याबाबत आनंद ललवाणी याने सांगितले, या उपग्रहाची निर्मिती करीत असताना आम्हाला अनेक अडचणीचा सामना करावा लागला. मात्र, त्या सर्वांवर मात करून आमच्या विद्यार्थ्यांच्या गटाने या उपग्रहाची यशस्वी निर्मिती केली याचा आम्हाला आनंद आहे. विशेष म्हणजे अनेक गोष्टींचा पुनर्वापर आम्ही यावेळी या उपग्रहाची निर्मिती करताना केला आहे. आम्ही तयार केलेल्या या उपग्रहाला अत्युच्च क्षमतेचे सौरउर्जेवर चालणारे एलईडी बसविले असून अवकाशातून हा उपग्रह पाहणे व त्याची जागा निश्चित करणे शक्य होणार आहे. याचा उपयोग इतर उपग्रहांना जागा निश्चिती करण्यासाठी होऊ शकेल.