डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनतर्फे निर्माल्य संकलन – रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड आणि स्वच्छ यांचाही सहभाग
पुणे ता. १८ :- डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनच्यावतीने यंदाही गणेशोत्त्सव काळात ‘निर्माल्य संकलन’ उपक्रम राबविण्यात येणार असून, या उपक्रमानुसार नागरिकांकडून निर्माल्य गोळा केले जाणार आहे. त्या निर्माल्यावर प्रक्रिया त्याचे खात नागरिकांना विनामुल्य देण्यात येणार आहे.
गणेश विसर्जनाच्यावेळी भाविकांकडून नदीमध्ये निर्माल्य टाकले जाते. त्यामुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी सहा वर्षापासून डी. एस. कुलकर्णी फाउंडेशन कार्यरत आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूड आणि स्वच्छ या संस्थाही या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे फाउंडेशनच्या विश्वस्त सौ. भाग्यश्री कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘निर्माल्य संकलन’ या उपक्रमाअंतर्गत गौरी आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी अनुक्रमे २२ आणि २७ सप्टेंबर प्रमुख घाटावर निर्माल्य संकलन केले जाणार आहे. गरवारे महाविद्यालय, ठोसरपागा, अष्टभुजा, विठ्ठल मंदिर, मातोश्री वृद्धाश्रम राजाराम पूल, बापू घाट, कमिन्स कॉलेज, पंडित फार्म्स येथे दोन जागी, बीएमसी आर्किटेक्ट कॉलेज या ठिकाणी स्वयंसेवक नेमण्यात येतील. यामध्ये एरंडवणा स्कूल, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे युनिवर्सिटी पर्यावरण विभागाचे विद्यार्थी हे स्वयंसेवक म्हणून सहभागी होणार आहेत. नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता कागदी किंवा कापडी पिशवीत स्वयंसेवकांकडे द्यावे. ३० दिवसांनी नागरिकांना त्याचे खत मोफत देण्यात येणार असल्याचे सौ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
आपले घर स्वच्छ राहावे यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. त्याप्रमाणे आपल्या शहरातील नदीही स्वच्छ राहावी यासाठी आमच्या या उपक्रमाला जास्तीत जास्त सहकार्य करावे अशी भावना रोटरी कल्बच्या सदस्यांनी व्यक्त केली. याशिवाय आरोग्यसंपन्न किंवा निरोगी पर्यावरणीय परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी आपलीच आहे त्यासाठी नदी स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यादृष्टीने हा उपक्रम राबविला जात असल्याचे फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के म्हणाले.
रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूड गेली अनेक वर्ष डी. एस. कुलकर्णी फाउंडेशन समवेत निर्माल्य संकलन मोहीम यशस्वीपणे राबवत असून, यावर्षी देखील रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूडचे सभासद व २०० हून अधिक स्वयंसेवक यांचा सहभाग निर्माल्य संकलनामध्ये असणार आहे. असे रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूडचे अध्यक्ष उज्ज्वल तावडे यांनी यावेळी सांगितले.