पुणे- एकीकडे भटके कुत्रे व मांजरांची मोठ्या पैदास वाढवली जाते त्याचबरोबर अशा प्राण्यांना त्रास देण्याच्या किंवा विष घालून मारुन टाकण्याच्या घटना घडतात. या दोन्ही समस्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक स्वयंसेवी संघटना व प्राणी चळवळ गट कुटुंबांना भटके कुत्रे व मांजरे दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यामागे या भटक्या प्राण्यांचे जीवन सुधारणे आणि अशा प्राण्यांची बेकायदा पैदास करण्याची प्रथा कमी करणे, हे दोन हेतू आहेत. प्राण्यांच्या सुखासाठी मदत करण्यातून आरोग्यासाठी किती मुबलक फायदे होतात, हे विसरता येणार नाही.
हाच विचार मनात ठेऊन पुण्यातील ॲनिमल ॲडॉप्शन अँड रेस्क्यु टीमने (एएआरटी) येत्या १७ डिसेंबरला येथे प्राणी दत्तक शिबिराचे आयोजन केले आहे. कोथरुड येथील कलमाडी शामराव हायस्कूलमध्ये सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत होणाऱ्या या शिबिरात ७५ हून अधिक भटक्या कुत्र्यांची व मांजरांची पिले दत्तक घेण्यासाठी आणली जाणे अपेक्षित आहे. याकामी रस असणारी कुटूंबे आणि पाळीव प्राणीप्रेमींनी शिबिराला भेट देऊन त्यांच्या पसंतीनुसार ही पिले दत्तक घ्यावीत, असे आवाहन ‘एएआरटी’ने केले आहे.
याआधीच्या अशाच शिबिरातही ७० हून अधिक भटक्या कुत्र्यांची व मांजरांची पिले दत्तक घेण्यात आली होती. ‘एएआरटी’च्या संस्थापक भारती तांबे म्हणाल्या, “शिबिरात दत्तक देण्यासाठी येणारी भटक्या कुत्र्यांची आणि मांजरांची पिले रस्त्यावरुन सुटका करुन आणलेली असतात. ती इतकी लहान व दुबळी असतात, की त्यांना रस्त्यावर आपले पोटही भरता येत नाही. अशा पिलांचे संगोपन आमच्या कार्यकर्त्यांकडून केले जाते आणि ती निरोगी व गुटगुटीत झाल्यावर मगच त्यांना दत्तक दिले जाते.”
पुण्यात आतापर्यंत झालेल्या १२० प्राणी दत्तक शिबिरांपैकी ११ हून अधिक शिबिरे ‘एएआरटी’ने आयोजित केली आहेत. जानेवारी २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या काळात संयोजकांच्या प्रयत्नांतून २६० हून अधिक भटक्या कुत्र्यांची व १७० मांजरांची पिले, सहा भटकी कुत्री व तीन ससे असे प्राणी दत्तक देण्यात आले आहेत.
या आगामी प्राणी दत्तक शिबिरात येणाऱ्या सर्व पाळीव प्राण्यांची प्रथम नोंदणी करुन त्यांना नंबर टॅग लावले जातील आणि नंतर पशुवैद्याकडून तपासणी केली जाईल. त्यानंतरच इच्छुकांना त्यांच्या पसंतीनुसार पिलू दत्तक घेण्याची मुभा असेल. ही निवड केल्यानंतर पालकांना ‘एएआरटी’च्या संघाकडून सल्ला-मार्गदर्शन पुरवले जाईल. दत्तक प्रक्रियेचे निकष पूर्ण केल्यावर मगच त्यासंबंधीच्या अर्जांवर सह्या होतील. संस्थेतर्फे नंतरच्या नियमित देखरेखीसाठी पिलू दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या निवासाच्या पुराव्याची प्रत व छायाचित्र अर्जासोबत ठेऊन घेतले जाईल.असे आयोजक भारती तांबे, मोबाईल : ९९२२६१७१७८ किंवा ९८८१४६७८९५ यांनी कळविले आहे .