सिंधुदुर्ग -मिडीयाला सांगण्यासारखे काही नाही,असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक व खासदार नारायण राणे यांची कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथील ओम गणेश या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन दिग्गज नेत्यांत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी सांगितले की, मिडियाला सांगण्यासारखं माझ्याकडे आणि राणे यांच्याकडेही काही नाही. दरम्यान, पवार – राणे यांची ही एक कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत असले तरी ,पवारांचे राजकारण जाणून असणाऱ्या राजकीय समीक्षकांच्या भुवया मात्र या भेटीमुळे उंचावल्या आहेत . राणे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असतात ,कॉंग्रेस शी त्यांनी फारकत घेतलेली आहे . अशा स्थितीत या भेटीने कुतुहूल निर्माण झाले नाही तर नवलच .
शरद पवार दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौ-यावर आहेत. आंबोली, वेंगुर्लेचा दौरा करून पवार रविवारी सायंकाळी मालवणात दाखल झाले. यानंतर त्यांनी देवबाग येथे मुक्काम ठोकला. आज सकाळी मालवण देवली येथील कार्यक्रम आटोपून दुपारी दोनच्या सुमारास पवार हे आपले दोन नातू रोहित पवार व पार्थ पवार यांच्यासह नारायण राणे यांच्या कणकवलीमधील निवासस्थानी दाखल झाले. खासदार नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी पवार यांचे स्वागत केले. यानंतर राणे कुटुंबिय आणि पवार यांच्यात चर्चा झाली..