पुणे-शिवाजीनगरच्या वाकडेवाडी येथील पाटील इस्टेटच्या झोपडपट्टीत भीषण आग लागली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीच्या भीषण तीव्रतेमुळे २००हून आधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्या आहेत. शर्थीचे प्रयत्न करून पावणेपाच वाजता आग आटोक्यात आणण्यात आली .झोपडपट्टीतील 10 सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग आणखी भडकली. या आगीत मोठी वित्तहानी झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
आग लागल्याचे समजताच संगमवाडी ब्रीज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला . सिलेंडरच्या गळतीमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली . २०० हून अधिक घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना मोठे प्रयत्न करावे लागले .
पाटील इस्टेटच्या एका बाजूला नदी वाहते असून दुसऱ्या बाजूने अंदाजे ५०० हुन अधिक मीटर अंतरावर घरे आहे. आत जाणारा रस्ता खूपच छोटा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत जाता येत नाही. पाईपद्वारे पाणी नेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला .
सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड समोरील शिरोडकर पॅकेजिंग इंडस्ट्रीजला बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत या कंपनीतील अर्धे अधिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले . यातील माल आणि इतर साहित्य मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
अग्निशमन दलाला रात्री तीन वाजता चौगुले इंडस्ट्रीजजवळ आग लागल्याची माहिती देणारा फोन आला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि तीन पाण्याचे टँकर तातडीने घटनास्थळी रवाना झाले. अथक प्रयत्नानंतर जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु या आगीत कंपनीतील अर्धे अधिक साहित्य जाळून खाक झाले होते.
या कंपनीत मशिनरी पॅकिंगसाठी लागणारे लाकडी बॉक्स तयार करण्यात येतात. घटनेत पॅकिंग मशिनरी, रॉ-मटेरिअल पूर्णपणे जळून खाक झाल्याने कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शार्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.