पुणे -आषाढ महिन्याचा प्रथम दिन म्हणजे संस्कृत साहित्यिकांचा आनंदाचा, सणाचा दिवस .हा दिवस संपूर्ण देशभरात महाकवी कालिदास दिन व देवभाषा संस्कृत दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो .याच दिनाचे औचित्य साधून डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत शुक्रवार दि.१३/७/२०१८ रोजी संस्कृत दिन विविध कार्यक्रमांनी व मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व महाकवी कालिदास यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. यावेळी शाळा समिती अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री .सुनीलजी भंडगे ,संस्थेच्या पदाधिकारी माननीय डॉक्टर सविताताई केळकर, शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ ,ज्येष्ठ शिक्षक सौ .तनुजा तिकोने, श्री .धनंजय तळपे, सौ .जयश्री खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
माननीय मुख्याध्यापिका सौ कल्पना वाघ यांनी स्वागत व प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून संस्कृत दिनाच्या शुभेच्छा दिल्या .सौ.अर्चना देव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व माननीय मुख्याध्यापिका सौ .कल्पना वाघ यांनी शाळेच्या वतीने पुस्तक भेट देऊन मान्यवरांचा सत्कार केला. सौ .स्वाती तळपे यांनी संस्कृत दिन व महाकवी कालिदास यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
माननीय डॉक्टर सविताताई केळकर यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नवीन भाषा शिकून माणूस म्हणून मोठे होण्याचा संदेश दिला .माननीय डॉक्टर सुनीलजी भंडगे यांनी संस्कृत भाषेमुळे वाणी शुद्ध होते असे विचार व्यक्त करून संस्कृत गीताच्या दोन ओळी विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतलेल्या. इयत्ता तिसरी मुठा वर्गातील विद्यार्थ्यांनी मम माता ,पक्षि गीतम् इत्यादी संस्कृत गीते सादर केली. तसेच इयत्ता चौथी शिवनेरी वर्गातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पक्षी मोर याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती संस्कृत नाट्याविष्कारातून सादर केली.
सौ. अर्चना देव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ .योगिता भावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले .अशाप्रकारे संस्कृत दिनाचा कार्यक्रम नवीन मराठी शाळेत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.