पुणे ःपणत्यांनी उजळलेले सभागृह,ज्येष्ठ नाट्यकलावंतांचा सन्मान, नांदीचे सादरीकरण , जुना काळ संवादातून उभा करणारे स्मरणरंजन अशा मंतरलेल्या वातावरणात १७५ वर्षे साजरा करणाऱ्या मराठी रंगभूमीचा अमृत सोहळा रसिकांनी अनुभवला !
निमित्त होते’भारतीय विद्या भवन’ आणि ’इन्फोसिस फाऊंडेशन’ आयोजित
‘नमन नटवरा’ या संगीत रंगभूमीच्या वैभवशाली पर्वाच्या सुरेल मैफिलीचे !
‘संवाद पुणे’ आणि ‘पायल वृंद पुणे’ संस्थांच्या वतीने प्रस्तुत हा कार्यक्रम रविवार, दि. 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता भारतीय विद्या भवन’चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह’, सेनापती बापट रोड येथे झाला.
‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे, यांनी प्रास्ताविक केले.सुनील महाजन यांनी सूत्रसंचालन केले.भाग्यश्री देसाई,निकिता मोघे आदि उपस्थित होते.’भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित ६० वा कार्यक्रम होता. या वेळच्या कार्यक्रमाचे संयोजन सुनील महाजन, निकिता मोघे आणि प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी केले.
या कार्यक्रमात संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मा.दीनानाथ मंगेशकर, छोटा गंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे, पं.राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, जयमाला शिलेदार यांच्या गायन परंपरा जतन करणार्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्याशी डॉ. वंदना धांगुर्डे यांनी संवाद साधला.ज्येष्ठ नाटयकलावंत निर्मला गोगटे, फैयाज, डॉ. वंदना घांगुर्डे, रजनी जोशी, डॉ. मुकुंद राम मराठे आणि डॉ. रवींद्र घांगुर्डे यांचा सन्मान करण्यात आला.मराठी रंगभूमीची परंपरा जपणाऱ्या भरत नाट्य मंदिरचे अध्यक्ष आनंद पानसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.संगीत रंगभूमीची सुरेल परंपरा जपणारे सुप्रसिध्द गायक – गायिका, अभिनेता – अभिनेत्री यांचे गाजलेल्या नाट्यपदांचे गायन, त्यांचे रंगभूमीवरील किस्से यांची सुरेल मेजवानी देखील पुणेकरांना अनुभवायला मिळाली.या कलाकारांनी रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला पणत्या उजळून दिवाळीचे स्वागत केले. कार्यक्रमाला ‘मराठी नाट्यपरिषद कोथरूड शाखा’चे सहकार्य लाभले .
5 नोव्हेंबर इ. सन.1843 या दिवशी आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या संगीत सीता स्वयंवर या नाटकाने मराठी संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली गेली. रंगभूमीच्या इतिहासात 5 नोव्हेंबर ’मराठी रंगभूमी’ दिवस म्हणून नोंदविण्यात आला. 5 नोव्हें 2018 या दिवशी रंगभूमी 175 व्या वर्षात पदार्पण करित आहे. हे औचित्य साधून मराठी रंगभूमी दिनाच्या शतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळ्याच्या पूर्व संध्येला हा कार्यक्रम झाला.