पुणे, : महावितरणच्या नवीन वीजजोडणीच्या मोबाईल अॅपमधून गेल्या महिन्याभरात पुणे परिमंडलात 2169 नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत तर मीटर रिडींग अॅपद्वारे प्रोसेसिंग सायकलनुसार 2 लाख 33 हजार 230 वीजमीटरचे फोटो रिडींग घेण्यात आले आहे.
मोबाईल अॅपच्या माध्यमातून पुणे परिमंडलात नवीन वीजजोडणी देण्याचे व फोटो मीटर रिडींग घेण्याचे कामकाज सुरळीत झाले आहे. येत्या दि. 1 सप्टेंबरपासून पुणे परिमंडलातील रेडिओ फ्रिक्वेंसी, इन्फ्रा रेड व मीटर रिडींग इन्स्ट्रूमेंटने सुरु असलेले मीटर रिडींग वगळता उर्वरित लघुदाब वीजग्राहकांच्या मीटरचे मोबाईल अॅपद्वारे प्रोसेसिंग सायकलनुसार फोटो रिडींग घेण्यात येणार आहे.
मोबाईल अॅपच्या माध्यमातून नवीन वीजजोडणी देण्यास पुणे परिमंडलामध्ये महिन्याभरापूर्वी सुरवात झाली होती. यात तब्बल 2169 वीजग्राहकांना अॅपमधून नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. याशिवाय पुणे परिमंडलात सर्वच बारा विभागात महावितरणचे कर्मचारी व फोटो मीटर रिडींगचे कंत्राटदार यांच्याकडून मोबाईल अॅपद्वारे फोटो मीटर रिडींग घेण्यात येत आहे. यात प्रोसेसिंग सायकलनुसार एकूण 2,33,230 ग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात आलेले आहे. याशिवाय मोबाईल अॅपद्वारे उपकेंद्गातील फिडर व वितरण रोहित्रांचे रिडींग घेणे सुरु झाले आहे.
महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे फोटो मीटर रिडींग सुरु झाल्यामुळे त्यातील मानवी हस्तक्षेप पूर्णतः संपुष्टात येत आहे. मीटर रिडींग व फोटो अॅपद्वारेच महावितरणच्या सर्व्हरमध्ये पाठविले जात असून प्रोसेसिंग सायकलनुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून थेट वीजदेयके तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. फोटो मीटर रिडींग घेताना अक्षांश-रेखांशची भौगोलिक नोंद अनिवार्य असल्याने सरासरी, चुकीच्या युनिटचे मीटर रिडींग होऊ शकणार नाहीत. एका मोबाईलमधील मीटर रिडींग अॅपमधून दिवसभरात एक हजार मीटरचे रिडींग घेणे शक्य झाले आहे.
4.32 लाख वीजग्राहकांना एका क्लिकवर ग्राहकसेवा उपलब्ध
तत्पर ग्राहकसेवेसाठी महावितरणने वीजग्राहकांसाठी ‘महावितरण मोबाईल अॅप’ उपलब्ध करून दिला आहे. गेल्या दीड महिन्यात राज्यातील 4,32,476 वीजग्राहकांनी हा मोबाईल अॅप डाऊनलोड केला आहे. यात महावितरणची वेबसाईट- 64,197, गुगल प्ले स्टोअर – 3,52,854, अॅपल प्ले स्टोअर – 10,694 तर विन्डोज स्टोअरवरून 4,731 हा अॅप डाऊनलोड करण्यात आला आहे. या सर्व वीजग्राहकांना महावितरणची विविध ग्राहकसेवा आता एका क्लिकवर उपलब्ध झालेली आहे. वीजग्राहकांनी ग्राहकसेवेसाठी असलेला ‘महावितरण मोबाईल अॅप’ डाऊनलोड करून घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.