पुणे-अॅल्कॉन स्टाइलस’,’रॉयल एक्झॉटिका’दोघांचा हलगर्जीपणा 15 जणांचे बळी घेवून गेला असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे .’अॅल्कॉन स्टाइलस’ या इमारतीची सीमा भिंत भराव थोपविण्यासाठी (रिटेनिंग वॉल) बांधली असली तरी, तिचे बांधकाम तुलनेने निकृष्ट दर्जाचे केल्याचे महापालिका आणि पोलिसांच्या तपासणीत आढळून आले आहे. ही भिंत ‘आरसीसी’ बांधकामाद्वारे बांधणे अपेक्षित असताना तिचे कच्चे बांधकाम केल्याचा दावा ‘रॉयल एक्झॉटिका’च्या पंकज व्होरा यांनी केला आहे. दरम्यान, बांधकाम साइटवर मजुरांना राहण्यासाठी धोकादायक पद्धतीने पत्र्याच्या खोल्या बांधण्यात आल्याचा दावा पोलिसांनी तक्रारीत केला आहे. अशा प्रकारे १५ मजुरांच्या मृत्यूला जबाबदार धरून पोलिसांनी दोन्हीही बांधकाम व्यावसायिकांसह त्यांच्या इंजिनीअर्सवर गुन्हा दाखल केला आहे. ‘अॅल्कॉन स्टाइलस’ या इमारतीची सीमा भिंत पडल्याने ‘रॉयल एक्झॉटिका’च्या कामगारांना जीव गमवावा लागला.
‘अॅल्कॉन लँडमार्क्स’यांनी कोंढवा येथे ‘अॅल्कॉन स्टाइलस’ या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये सुरू करून २०१९मध्ये पूर्ण करण्यात आले. या ठिकाणी पार्किंगच्या जागेत भराव टाकण्यात आला असून, हा भराव बंदिस्त करण्यासाठी सीमा भिंत (रिटेनिंग वॉल) बांधण्यात आली. ही भिंत ‘आरसीसी’ बांधकामाद्वारे चांगल्या पद्धतीने बांधणे अपेक्षित होते. मात्र, तिचे बांधकाम तुलनेने चांगल्या दर्जाचे झाले नाही, असा प्राथमिक अंदाज पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी ‘रॉयल एक्झॉटिका’च्या व्होरा यांनी ‘अॅल्कॉन लँडमार्क्स’वर आरोप करून सीमा भिंतीचे बांधकाम कच्च्या स्वरुपात असल्याचा दावा केला आहे. ‘या भिंतीजवळ आम्ही कोणतेही खोदकाम केलेले नाही. ही भिंत रिटेनिंग वॉल असल्याने ती कच्च्या बांधकामाची असेल, अशी आम्हाला कल्पना येणे शक्य नाही. त्यामुळे त्या भिंतीच्या पलीकडे माझे कामगार राहत होते. ही भिंत कच्च्या बांधकामामुळे पडून दुर्घटना घडली आहे,’ असाही दावा व्होरा यांनी केला आहे.
भिंतीलगत ‘रॉयल एक्झॉटिका’ या इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथील कामागारांसाठी पत्र्याच्या शेडमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेच्या नियमानुसार या मजुरांची राहण्याची सोय सुरक्षा भिंतीलगत करणे योग्य नव्हते. तरीही ‘कांचन’ या बांधकाम व्यावसायिक फर्मने त्या ठिकाणी मजुरांची राहण्याची व्यवस्था केली. ही व्यवस्था भिंतीपासून सध्यापेक्षा १० फूट लांब करण्यात असती, तर अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागले नसते. मात्र, या बांधकाम व्यावसायिकांनी निष्काळजीपणा दाखविल्याने त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला .