दोनशे गरजू विद्यार्थिनींना इनरव्हील क्लब, झूमकार यांच्या वतीने मोफत सायकल वाटप
पुणे : प्रवासाच्या साधनांचा अभाव असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन इनरव्हील क्लब डिस्ट्रिक्ट ३१३ आणि झूमकार यांच्या संयुक्त विद्यमाने दोनशे गरजू व होतकरू विद्यार्थीनींना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्यामुळे या दोनशे विद्यार्थिनींच्या पाठीवरचे ओझे कमी झाले आहे.
या दोन्ही संस्थांच्या वतीने या सायकल वाटपाच्या कार्यक्रमाचे महाविर जैन विद्यालयात नुकतेच आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इनरव्हील असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा स्मिता पिंगळे उपस्थित होत्या. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा रेणू गुप्ता आणि डॉ. सिमरन जेठवानी, ‘झुमकार’चे ख्रिस्तापर पॉल, गणपती सुब्रह्मण्यम आदी उपस्थित होते. पुण्यासह अहमदनगर, अकलूज, औरंगाबाद, जालना, खोपोली, लोणंद, मंचर, पंढरपूर, सोलापूर, तळेगाव आदी ठिकाणच्या क्लबचा या उपक्रमात सहभाग होता.
मोबाईलवरील एका बटनाद्वारे आज आपण कार-टॅक्सी जागेवर बोलवतो. पण या आधुनिक काळातही काही भागातील लोकांना प्रवासाची साधने नाहीत किंवा ती परवडत नाहीत. त्यामुळे ते पायी जाण्याचा पर्याय निवडतात. अशावेळी प्रवासासाठी सायकलही त्यांच्यासाठी खूप मोठे साधन असते. ग्रामीण भागातील या मुलींना शाळेत जाण्याची सोय व्हावी, या उद्देशाने गरजू आणि होतकरू मुलींना सायकल वाटप करण्यात आले, ही बाब विधायक असल्याचे स्मिता पिंगळे म्हणाल्या.
शिक्षण आरोग्य पर्यावरण आणि महिला सशक्तिकरण या क्षेत्रांमध्ये इनरव्हील क्लब काम करत असल्याचे रेणू गुप्ता यांनी सांगितले.