पुणे-– महाऊर्जा मुख्यालयाची अत्याधुनिक इमारत ही देशातील एक आदर्श कार्यालयाची इमारत म्हणून निर्माण केली जाणार आहे, या इमारतीत सौरऊर्जेचा सुयोग्य असा वापर करून ही पर्यावरणपूरक वास्तू निर्माण करण्यात येत आहे. येत्या काळात राज्यातील सर्वच शासकीय इमारतींची रचना पर्यावरणपूरक तत्त्वावर करून सौरऊर्जेच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांचा कायापालट करण्यात येईल, असे प्रतिपादन ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा तसेच राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या (महाऊर्जा) मुख्यालय इमारतीची पायाभरणी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट होते. यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, आमदार मेधा कुलकर्णी, महाऊर्जा महासंचालक आनंद लिमये, अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव, प्रदेश संचालक महेश आव्हाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, राज्य शासन सर्वांसाठी शाश्वत आणि स्वस्त वीज निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामध्ये महाऊर्जा संस्थेची महत्त्वाची भूमिका आहे. या संस्थेच्या कार्यालयाची निर्मिती अत्याधुनिक व पर्यावरणपूरक पद्धतीने निर्माण करून या प्रयत्नांची सकारात्मक सुरूवात झाली आहे. सर्वत्र 100 टक्के सौरऊर्जेवर आधारित वीजेचा वापर होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनीही त्यांच्या शेतात सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा.
पालकमंत्री श्री. बापट म्हणाले, महाऊर्जा कार्यालयाची इमारत ही एक आदर्श शासकीय इमारत म्हणून ओळखली जाईल. सौरऊर्जेच्या वापरामुळे मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडत आहे. शेतकऱ्यांनी याचा वापर केल्यास महावितरणच्या वीजेवर अवलंबून न राहता शेतकरी स्वयंपूर्ण बनण्यास मदत होईल.
याप्रसंगी जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महासंचालक आनंद लिमये, अतिरिक्त महासंचालक पुरुषोत्तम जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच प्रस्तावित इमारतीबाबत माहितीपर लघुपट दाखवण्यात आला. कार्यक्रमास महाऊर्जा विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते.
महाऊर्जा इमारतीची वैशिष्ट्ये
– नेट झिरो एनर्जी, ५ स्टार ग्रीहा मानांकन या पर्यावरणपूरक तत्वावर बांधकाम
– सुपर कन्झर्व्हेशन बिल्डिंग कोड (सुपर ईसीबीसी) मानांकन
– नैसर्गिक प्रकाश योजनेचा अधिकाधिक वापर
– एव्हॅपोरेटिव्ह कुलिंग तंत्रज्ञानाचा वापर जो ए.सी. पेक्षा 60 टक्के कमी वीज वापरतो
– भूमिगत एअर टनेलद्वारे नैसर्गिकरित्या आरामदायक तापमान राखले जाते
– नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांद्वारे इमारतीची 100 टक्के विजेची गरज भागविली जाईल.
– आधुनिक सौर डिझाईन संकल्पनेच्या मदतीने वातानुकूलन यंत्रणेचा कमीत कमी वापर
– इमारतीमध्ये अभिनव इंटिग्रेटेट फोटोव्होल्टाईक सिस्टीम
– अभिनव रेडियन्ट कुलिंग तंत्रज्ञानाचा वापर
– फ्री कुलिंगकरिता व्हेंचुरी इफेक्ट
– उत्सर्जित ऊर्जेपासून ताजी हवा व उष्णतेचे पुनरुज्जीवन