चांदणीचौकाच्या कामाला संरक्षण खात्याचा ग्रीनसिग्नल – गिरीश बापट
पुणे : चांदणी चौकातील एनडीए रस्यावरील बांधकामाला आज केन्द्रीय संरक्षण मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखविला.त्यापाठोपाठ लोहगाव विमानतळावरील कार्गोच्या स्थलांतरालाही संरक्षण खात्याने मान्यता दिली. त्यामुळे ही दोन्ही कामे आता तातडीने मार्गी लागतील. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी नवीदिल्ली येथे पत्रकारांना दिली.
संरक्षणमंत्री डाॅ. निर्मला सितारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवीदिल्ली येथे आज बैठक झाली. केंन्द्रीय् मंत्री नितीन गडकरी व संरक्षण खात्याचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. त्यामध्ये पुण्याच्या प्रश्नावर निर्णायक चर्चा झाली. अशी माहितीही बापट यांनी दिली. ते म्हणाले की चांदणी चौकातील उड्डाणपूल व रुंदीकरणाचा नियोजित प्रकल्प राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या हद्दीतून जातो. प्रबोधिनीची ४८ गुंठे जागा या प्रकल्पात आहे. ती ताब्यात देऊन त्याठिकाणचे उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यास संरक्षण मंत्रालयाने आज तत्वश: मान्यता दिली. या जमिनीच्या बदल्यात अहमदनगरमध्ये संरक्षण खात्याला जागा देण्याचे या बैठकीत ठरले.
लोहगाव विमानतळाचे विस्तारीकरण या विषयावरही या बैठकीत चर्चा झाली. संरक्षण खात्याने विस्तारीकरणासाठी पंधरा एकर जागा दिली आहे. तथापि कार्गोचे स्थलांतर न झाल्याने विस्तारीकरणाचे काम रखडले होते.कार्गोच्या स्थलांतराला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण पूर्ण होईल.