नव्या धाटणीची लव्ह स्टोरी ‘ढिनच्यॅक एंटरप्राइज’
प्रेमातुझा रंग कसा? याचं उत्तर कोणाला ठाऊक असेल माहित नाही पण त्याची प्रचीती स्वतःहून घेण्यासाठी सगळेच उत्सूक असतात. त्यामुळे आयुष्यात एकदातरी प्रेम करून पहायला हरकत नाही असो, आजकाल सगळ्याचं नात्याची समीकरणं बदलत चालल्याने नेमकं विश्वासाचं आणि हक्काचं नातं कोणतं याचा थांगपत्ता कित्येकांना शेवट पर्यंत लागत नाही. मात्र या सगळ्यांत माणुसकीचे असे एक नाते आहे जे वैश्विक मानले जाते. मात्र त्याचे परीस्थितीनुरूप पालटणारे स्वरूप नेमके कसे आहे यावर भाष्य करणारा ढिनच्यॅक एंटरप्राइज हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. २१ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात मनवा नाईक आणि भूषण प्रधान यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. त्याच प्रमाणे खुर्शीद लॉयर, मीना नाईक, अनंत जोग, सक्षम कुलकर्णी, अश्विनी एकबोटे यांच्याही भूमिका आहेत.
सिनेमात मीरा आणि विशाल यांच्या जोडीप्रमाणे सिनेमाची कथादेखील तितकिच संवेदनशील आणि सत्य परिस्थितीचा आढावा घेणारी आहे. सर्वसाधारण स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी किंवा प्रोडक्ट विकण्यासाठी वापरलं जाणारं मार्केटिंग समाजाच्या आणि माणसाच्या भल्यासाठी देखील वापरता येऊ शकतं यावर एकूणचं सिनेमाची कथा बेतली आहे. निशांत सपकाळे यांनी सिनेमाच दिग्दर्शन केल असून चार्मी गाला हे निर्माते आहेत. लव्ह प्रोडक्शन या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. ढिनच्यॅक एंटरप्राइज सिनेमा फक्त रोमॅंटिक कॉमेडी नसून प्रेक्षकांना डोळसपणे विचार करायला लावणारा सिनेमा आहे. सिनेसृष्टीत असे गंभीर विषय खूपच कमी हाताळले जातात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार हे विशेष आहे. उदयसिंग मोहिते यांनी छायाचित्रिकरणाची धुरा सांभाळली असून देवेंद्र मुरुडेश्वर यांनी सिनेमाचे संकलन केले आहे. समीर साप्तीक आणि काशी रिचर्ड यांनी मिळून सिनेमाला संगीत दिल आहे. सचिन पाठक आणि मयुर सपकाळे यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत तर हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या गायकांचा सिनेमातील गीतांना स्वरसाज चढला आहे. हिंदीतील प्रख्यात गायक मिकासिंग, हर्षदीप कौर, पापोन आणि शिंदे शाही गाजवणारा आदर्श शिंदे यांनी गाणी गायली आहेत.