पुणे – अपारदर्शक घट्ट पांढर्या रंगाचा वापर, रंगलेपनासाठी ब्लेड किंवा सुरीचा उपयोग करून प्रभावी व्यक्तिचित्र साकारण्याचा त्यांचा विशेष प्रयत्न असे. त्यांनी लहानपणापासून अखेरपर्यंत स्केचिंगची सवय जोपासली. नेहमीच काहीतरी नवीन करण्याची त्यांची उमेद होती. त्यांच्या चित्रांमधून कलात्मक व अभिजात कलेचा स्पर्श जाणवतो. असे मत त्यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव यांनी व्यक्त केले.
ग. नां. जाधव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे ‘सर्जन’ विभागाने आयोजित केलेल्या विशेष कार्यक‘मात श्रीकांत जाधव बोलत होते. शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. शाला समितीचे सदस्य डॉ. विनय आचार्य, मु‘याध्यापक नागेश मोने, उपमु‘याध्यापिका मनिषा मिनोचा, पर्यवेक्षिका सुषमा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. जाधव पुढे म्हणाले, ‘किर्लोस्कर, स्त्री, मनोहर या मासिकांची मुखपृष्ठे करण्यात ग. नां. चा मोलाचा वाटा होता. चौकस बुध्दी, उत्साह आणि अपार कष्ट करण्याची तयारी यांची देणगी त्यांना लाभली होती. सूक्ष्म निरीक्षण आणि कल्पकता यातून चित्र तयार करण्याचे त्यांचे कसब आश्चर्यकारक होते.’ यावेळी श्रीकांत जाधव यांनी चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर केले.
ग. नां. जाधवांनी काढलेल्या व्यक्तिचित्र व निसर्गचित्रांचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील, पंतप्रतिनिधी औंध महाराज, शंतनुराव किर्लोस्क्र, महादेवशास्त्री जोशी, ओमकारेश्वर, महालक्ष्मी मंदिर, पंचगंगा नदीचा घाट अशा २२ चित्रांचा प्रदर्शनात सहभाग होता. विकास पढेर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश वरगंटीवार यांनी परिचय करून दिला. मु‘याध्यापक मोने यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. हनुमंत तोडकर यांनी आभार मानले.