श्री क्षेत्र ओतूरला पहील्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री कपर्दीकेश्वरचरणी हजारो भाविक – तांदळाच्या कलात्मक पिंडीचे दर्शन
ओतुर ( संजोक काळदंते )-
श्री क्षेत्र ओतूर (ता.जुन्नर) येथे श्रावणी सोमवारनिमित्त शिवलिंगावर तयार करण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शन घेतले असल्याची माहिती श्री कपर्दीकेश्वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली.
पहिल्या सोमवारी यात्रेनिमित्त शालेय दिंडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यात गावातील सर्व शाळांनी सहभाग घेतला.
शिवलिंगावर करण्यात आलेल्या तांदळाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भाविक भक्त आले होते. मंदिर सकाळी सहा वाजता भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.श्री कपर्दिकेश्वर शिवलींगावर अभिषेक व महाआरती सपत्निक मयुर ढमाले,आत्माराम गाढवे,रघुनाथशेठ तांबे,किरण पानसरे,प्रमोद लोखंडे यांच्या हस्ते झाली यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे,वैभव तांबे,सचिन तांबे,प्रा.गणेश दामा आदी उपस्थित असल्याचे पुजारी गोविंदकाका डुंबरे,अनिलकाका तांबे,दत्तात्रयकाका शिंदे यांनी सांगितले.
या देवस्थानला ऐतिहासिक महत्व असल्याने व तिर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा असल्याने येथे प्रतिवर्षी भाविंकांची गर्दी होत असते त्याचप्रमाणे येथे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सद्गुरू चैतन्य महाराज संजीवन समाधी आहे याही समाधीचे भाविकांनी या निमित्ताने दर्शन घेतले.श्रावणी सोमवार निमित्त मोठी यात्रा भरली होती.आलेल्या भाविक भक्तांच्या येण्या जाण्यासाठी नारायणगाव एस.टी.आगाराच्या वतीने जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.आलेल्या भाविकांना चैतन्य गुरुकृपा फेब्रीकेशन्स मित्र मंडळ,कालिदास काका जोशी,ज्ञानेश्वर वाघोले,पांडुरंग ताजणे,पांडुशेठ वाकर यांच्या वतीने खिचडी , केळी,पेढे,फराळ वाटप करण्यात आले.शालेय दिंडी स्पर्धेत सहभागी बालदिंडी मधील वारक-यांना अविनाश ताजणे यांनी केळी वाटप केले तर यात्रानिमित्त भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक कार्यरत होते.मोठी गर्दी भरली असल्याने ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी पोलीस मित्र संघटनेचे स्वयंसेवक,आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात ठेवला होता यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.पहील्या श्रावणी सोमवारची यात्रा मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली.