पुणे- कथुवा येथील ८ वर्षाच्या चिमुरडीवर झालेला बलात्कार व निर्घृण खुनाच्या पाशवी कृत्यामुळे संताप आणि चिंता अशा संयुक्त विचारांचे वारे आज शहरातील महात्मा गांधी रस्त्यावर दिसून आले.कॉंग्रेस पक्षाने कॅण्डल मार्च आयोजित केला होता . विशेष म्हणजे या मार्च मध्ये नागरिक महिला मुलींसह तर काही कुटुंबासह उत्स्फुर्तपणे आणि अत्यंत शांतपणे काही काळ सहभागी झाल्याने असिफावरील अत्याचाराची जखम किती खोलवर रुजली आहे हे स्पष्ट दिसून आले. असिफ वरील पाशवी हल्ल्याने देश हादरून गेला आहे . घराघरात याप्रकाराने अनेकांना धक्का बसला आहे. आजच्या या कॅण्डल मार्च मध्ये पुणे कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,मोहन जोशी, उल्हास पवार,आबा बागुल, अभय छाजेड ,अरविंद शिंदे,अविनाश बागवे, अजित दरेकर, बंडू नलावडे ,मनीष आनंद ,कमल व्यवहारे, सतीश पवार ,शेखर कपोते ,राजू शेख, रमेश अय्यर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज सायंकाळी लष्कर परिसरातील संपूर्ण महात्मा गांधी रस्त्यावर “कॅण्डल मार्च” काढण्यात आला. यावेळी या रस्त्यावरील दुकानांमधील ग्राहक आणि दुकानदार यांनीही हा कॅण्डल मार्च जाईपर्यंत व्यवहार थांबविले आणि मूक प्रतिसाद दिला . या मार्च मध्ये विविध मार्गाने येवून काही कुटुंबे तर अनेक महिला मुलांसह उत्स्फुर्तपणे आणि गंभीरतेने सहभागी होताना दिसत होत्या.