पीएमपीएमएल ने खासगी ठेकेदारांना मालामाल करू नये -आबा बागुल
खासगी ठेकेदारांच्या बसेसमुळेच पीएमपीएल तोट्यात
ऑडिट रिपोर्टमध्ये धक्कादायक नोंद ;
पाच वर्षात पुणे महापालिकेकडून १ हजार ७६ कोटी अदा
खासगी बसेसचे कंत्राट रद्द करा:माजी उपमहापौर आबा बागुल यांची मुख्यामंत्र्यांकडे मागणी
पुणे –शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीएलच्या दुरवस्थेसह आर्थिक तोट्याला खासगी ठेकेदारांच्या बसेस कारणीभूत ठरत असल्याच्या धक्कादायक वस्तुस्थितीकडे ऑडिट रिपोर्टमधून लक्ष वेधण्यात आल्याने एक तर पीएमपीएलने स्वतःच्या बसेस घेऊन सक्षम व्हावे अन्यथा पीएमपी बससेवा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करावी ;पण कुठल्याही परिस्थितीत करदात्या पुणेकरांच्या रकमेतून बसेसचे ठेकेदार ‘मालामाल ‘करण्याचा प्रकार होऊ नये अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
एलबीटी व अन्य माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने महानगरपालिकेला आता विकासकामांसाठी निधी अपुरा पडत आहे . त्यात कर्जरोख्यातून २०० कोटींचे कर्ज उचलण्याची वेळ ओढवली आहे यापार्श्वभूमीवर यापुढे पीएमपीएलला अनुदान देणे शक्य होणार नाही. याची जाणीव पीएमपीएलच्या प्रशासनाला करून देण्याची गरज यानिमित्ताने उदभवली आहे.गेल्या पाच वर्षात फक्त पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीएलला सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी एक हजार ७६ कोटी रुपये अदा करण्यात आलेले आहे. त्यात पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेची रक्कम वेगळी आहे असे असतानाही पीएमपीच्या बससेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांची पासमधील सवलतही काढून घेण्यात आली आहे,असा अनागोंदी कारभार सुरु आहे. तत्कालीन पीएमटी असताना महानगरपालिकेला एक रुपयाही अनुदान द्यावे लागत नव्हते. मात्र आता पीएमपीएलला कोट्यवधींचे अनुदान देऊनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे, आर्थिक तोट्याला सामोरी जात आहे ;पण ज्या खासगी ठेकेदारांच्या बसेस पीएमपीएलच्या ताफ्यात आहेत,ते मात्र नफ्यात असल्याची वस्तुस्थिती आहे. उलट त्यांच्या बसेससाठीचे पैसे मनपाच्या पर्यायाने करदात्यांच्या रकमेतून बँकांना हप्त्यापोटी अदा होत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ठेकेदारांच्या बसेसमुळेच पीएमपीएलची दुरावस्था ,आर्थिक तोटा होत असल्याची गंभीर बाब ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे खासगी ठेकेदारांच्या घेतलेल्या बसेसचे कंत्राट रद्द करून पीएमपीएलने स्वतःच्या बसेस कर्ज काढून हप्त्याने घ्याव्यात ;पण कुठल्याही परिस्थितीत खासगी बसचे ठेकेदार मालामाल करू नये आणि त्यासाठी करदात्या पुणेकरांच्या रकमेवर पर्यायाने महापालिकेवर आर्थिक भार यापुढे लादू नये असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.