झी युवाने आजच्या तरुणाईचा विचार करत, “शौर्य-गाथा अभिमानाची” या कार्यक्रमाद्वारे एक हटके प्रयत्न केला आहे. आजच्या तरुणाईला महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य समजावे आणि आजच्या पिढीने आपल्या पोलिसांचा गर्व बाळगावा ; यासाठी, महाराष्ट्र पोलिसांची शौर्य गाथा सांगणारा हा एक नवीन दर्जेदार कार्यक्रम सुरु केला. २६/११ चा अतिरेकी हल्ल्याच्या थरारक गोष्टीपासून सुरु झालेला प्रवास , हा १९९३ चा बॉम्बब्लास्ट चा भयाण अनुभव , अमीरजादा केस , निडर महिला अधिकाऱ्यांचे शौर्य , शेरू मर्डर केस आणि शेंडे मिसळ केस मधील पोलिसांचे शौर्य , मन्या सुर्वेचा एन्काउंटर तर चार्ल्स शोभराजला जेरीस आणणाऱ्या पोलिसांची कथा आणि आता या शुक्रवारची राम आणि श्याम ह्या जोडगोळीचा गुन्ह्यांचा अंत करणारी आणि त्याचबरोबर अत्यंत गाजलेली अशी किरण दवे अपहरण केस , अश्या अनेक गोष्टींनी , प्रेक्षकांना पोलिसांच्या शौर्याची खरी माहिती देत , “शौर्य-गाथा अभिमानाची” लोकांच्या सर्वात आवडीचा कार्यक्रम बनला आहे . शौर्य – गाथा अभिमानाची या मालिकेद्वारे सर्वच प्रेक्षकांच्या मनातला, निधड्या छातीचा पोलीस, झी युवा, पुन्हा अत्यंत गर्वाने उभा करीत आहे. महाराष्ट्र पोलिसांचे अकल्पनीय शौर्य, पोलिसांच्याच दृष्टीने आणि त्यांच्याच मदतीने सांगितले जात आहे. शौर्य गाथा अभिमानाची हि केवळ छोट्या पडदयावर दर आठवड्याला दिसणारी साधी मालिका नाही आहे तर ते महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याचं मनाला विचलित करणारं, आंतरबाह्य ढवळून काढणारं असं एक जळजळीत वास्तव आहे आणि अश्या या कार्यक्रमाला एक दर्जेदार सूत्रधाराच्या आवाजाची अत्यंत गरज होती, असा आवाज, जो या कार्यक्रमाची योग्य अशी सुरुवात करेल, कार्यक्रमातील महत्वाचे मुद्दे ठळकपणे त्यांच्या शैलीत लोकांच्या नजरेस आणेल आणि कार्यक्रमाची योग्य रीतीने समाप्ती सुद्धा करेल. एकंदरीत या कार्यक्रमाला योग्य न्याय देईल. बऱ्याच शोधानंतर या कार्यक्रमाच्या दर्जाला शोभेल असा आवाज या कार्यक्रमाला मिळाला आणि ती निवड या प्रतिभावान कलाकाराने योग्यही ठरवली.
‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘काकस्पर्श’ अशा गाजलेल्या मराठी आणि तेवढ्याच ताकदीने हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा एक वेगळाच प्रभाव प्रेक्षकांवर पडणारे अभिनेते, ज्याची मराठीशी असलेली नाळ अतिशय घनिष्ठ आहे, ते म्हणजेच आपल्या सर्वांचे आवडते सचिन खेडेकर. अश्या ह्या, लोकांच्या आवडत्या अभिनेत्याचा, सच्चा आवाज, झी युवाच्या “शौर्य – गाथा अभिमानाची ” या कार्यक्रमात आपल्याला ऐकायला मिळत आहे. “शौर्य-गाथा अभिमानाची” या कार्यक्रमात सचिन खेडेकर यांचा खरंच मोलाचा वाटा आहे. ज्या पद्धतीने ते मालिकेतील घडलेल्या आणि घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना सांगतात, त्या घटना प्रेक्षकांना पोलिसांच्या सत्य शौर्याची आणि त्यावेळीच्या परिस्थितीची जाणीव करून देतात, ते लक्षणीय आहे. खेडेकरांचा घटनेला सुसंगत असा भारदस्त आवाज “शौर्य गाथा अभिमानाची ” या कार्यक्रमाला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतोय. सचिन खेडेकर यांना अभिनय करताना पाहणे नेहमीच आवडते, मात्र यावेळी त्यांच्या आवाजातील अभिनय प्रेक्षकांना “ऐकायला “मिळतोय आणि प्रेक्षकांना सुद्धा सचिन खेडेकरांना “ऐकण्याचा “अनुभव आवडत सुद्धा आहे.
या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.