झी टॉंकीजवर रंगणार दादासाहेब फाळके पुरस्कार २०१५ सोहळा
मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेले दादासाहेब फाळके हे आजही आपल्या स्मरणात आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान अमुल्य आहे. मराठी चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब मराठी चित्रपट पुरस्कार ग्रँड हयात येथे पार पडला होता. या सोहळ्याचा आनंद प्रेक्षकांना घेता यावा यासाठी येत्या १९ जूनला झी टॉंकीज वर संध्याकाळी ७ वाजता याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ ‘दादासाहेब फाळके मराठी सांस्कृतिक कार्य’ (एम.एस.के.) ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान पुरस्कार सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष असून अँड. मोहनराव पिंपळे हे प्रमुख अध्यक्ष तर दिपाली सय्यद हया अध्यक्षा विश्वस्त आहेत.
सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सरला येवलेकर यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार २०१५ प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री मा. विनोदजी तावडे यांनी या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली होती. मराठी चित्रपट सृष्टीतील आपल्या अभिनयाने मनोरंजन करणाऱ्या राकेश बापट, मानसी नाईक, आदिनाथ कोठारे, स्वप्नील जोशी अशा अनेक नामवंत कलाकारांसोबतच दिपाली सय्यद यांनी देखील आपल्या बहारदार नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली तर मृण्मयी देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.