नृत्यकौशल्याच्या व अभिनयाच्या अचूक टायमिंगने रसिकांना मनोरंजनाचा आनंद देणारे अभिनेता जावेद जाफरी आता मऱ्हाठमोळं रॅपसॉंग गात आजच्या तरुणाईला बदल घडवायची जाणीव करून देणार आहेत. युथ या आगामी मराठी चित्रपटासाठी हे रॅपसॉंग त्यांनी गायलं आहे. २० मे ला युथ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या मऱ्हाठमोळ्या रॅपसॉंगला दिलेला हिंग्लिश शब्दांचा तडका यामुळे हे रॅपसॉंग अधिकच परिणामकारक झालं आहे. ‘बंद कर राग डोक्यात गेली आग’ असे बोल असलेल्या या रॅपसॉंगमधून आजची राजकीय परिस्थिती दर्शवत तरुणाईला बदल घडवायची जाणीव करून दिली आहे. जावेद जाफरी यांनी मराठीत गायलेलं हे पहिलंच मऱ्हाठमोळं रॅपसॉंग आहे.
आपली आजची परिस्थिती ही खरच विचार करायला लावणारी आहे. आजच्या तरुणाईने विचार करत ही परिस्थिती बदलावी यासाठी प्रयत्न करायला हवेत. या रॅपसॉंगच्या माध्यमातून हा विचार तरुणाईपर्यंत पोहचवता येणार असल्याने या रॅपसॉंगला मी होकार दिल्याचं जावेद जाफरी सांगतात. विशाल-जगदीश यांनी शब्दबद्ध केलेल्या या रॅपसॉंगला त्यांचच संगीत लाभलं आहे.
व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित युथ या आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साह, उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन युथ सिनेमामधून पहाता येणार आहे. राकेश कुडाळकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
नेहा महाजन, अक्षय वाघमारे, मीरा जोशी, अक्षयम्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या नव्या दमाच्या कलाकारांसोबत विक्रम गोखले, सतीश पुळेकर या मातब्बर कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.
२० मे ला युथ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.