‘जरा संभालके’ ‘ट्रॅफिक सिग्नल’ हे हिंदी तसेच ‘दुर्गा म्हणत्यात मला’, ‘राडा रॉक्स’ ‘सुखांत’ यासारख्या मराठी चित्रपट व नाटकांमधून भूमिका साकारणारी अभिनेत्री योगिता दांडेकरच्या विविधांगी भूमिकांचं आजवर चांगलंच कौतुक झालं आहे. आता निर्भया या आगामी मराठी चित्रपटात ती झळकणार आहे. स्वानंदी प्रोडक्शन प्रस्तुत निर्भया हा मराठी सिनेमा येत्या ६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाची निर्मिती अमोल अहिरराव यांची असून दिग्दर्शन आनंद बच्छाव (साई आनंद) यांचं आहे.
सार्वजनिक ठिकाणी मुलींना, महिलांना मोठय़ा प्रमाणावर लैंगिक छळवणुकीचा सामना करावा लागतो. या महत्त्वाच्या मुद्दय़ावर बेतलेल्या निर्भया या सिनेमात योगिता एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना योगिता सांगते की, कठोर वास्तवाचा अनुभव देणारा हा सिनेमा असून एका दुर्देवी घटनेनंतरचा जीवन संघर्ष, भाव-भावनांचे चढ उतार यांचे हृदयद्रावक चित्रण या चित्रपटात पहायला मिळते. त्या घटनेनंतर बदललेलं आयुष्य आणि त्यानंतरचा प्रवास दाखवणं हा माझ्या अभिनयाला आव्हान देणारा भाग होता. तो मी पेलण्याचा प्रयत्न केला असून प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल असा विश्वास योगिता व्यक्त करते.
निर्भया चित्रपटाची कथा संतोष हुदलीकर यांची असून पटकथा-संवाद डॉ. मुरलीधर भावसार यांचे आहेत. संकलन विनोद चौरसिया तर छायांकन मनिष पटेल यांचं आहे. गीते बाबासाहेब सौदागर, अभिजीत कुलकर्णी, ज्ञानेश्वर वाघ यांनी लिहिली असून संगीत देव-आशिष यांचं आहे. सहनिर्माते नितीन पाटील आहेत. ६ ऑक्टोबरला निर्भया प्रदर्शित होत आहे.