पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएमच्या पुणे विभागाच्यावतीने औद्योगिक कंपन्यातून नव्याने रुजू झालेल्या मनुष्यबळ व्यवस्थापक अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘इंटरॅक्टिव्ह सेशन ऑन इंडस्ट्री रिलेशन फॉर यंग एच आर प्रोफेशनल्स’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक व ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ञ् डी. बी. निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर येथील हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात झालेल्या या एकदिवसीय कार्यशाळेत ऍड. आदित्य जोशी, ऍड. हर्षद गोखले, यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस,लिप टू एक्सेल कन्स्लटिंगचे एच आर प्रोसेस विभागाचे प्रॅक्टिस हेड समीर कुकडे,भारत फोर्ज लि. च्या औद्योगिक संबंध विभागाचे उपाध्यक्ष अभिजीत शहा या मान्यवरांची व्याख्याने झाली तर कार्यशाळेच्या समारोप सत्रात विलो मॅथर अँड प्लॅंट पंप्स कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष सुनील कोदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मुख्यतः कामगार कायद्यातील नवे बदल, विभागीय चौकशी,मनुष्यबळ व्यवस्थापकांपुढील आव्हाने, कार्यपद्धतीतील नवे बदल यासंबंधी विविध उदाहरणांसह व्याख्यात्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, हिंजवडी,चाकण आदी परिसरातील सुमारे पन्नासहुन अधिक औद्योगिक कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक अधिकारी व विविध मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक अभिजित शहा यांनी, सूत्रसंचालन अजय कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अमितकुमासर गिरी यांनी केले.