येरवडा कारागॄह आणि कोविड महामारी – संघर्षाचे वास्तव

Date:

वर्ष २०२० उजाडले काही नवीन आशा –उमेद घेवून पण ही आस काही फार काळ टिकली नाही. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दर १०० वर्षांनी निसर्ग आपले रौद्र रुप दाखवतो म्हणतात ते खरेच आहे. मार्च २०२० च्या अखेरीस अचानक कोरोना (कोविड-१९) नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले आणि हा हा म्हणत या विषाणूने महामारीचे रुप कधी धारण केले समजलेच नाही. प्रत्येक देशासाठी ही नवीन आकस्मिक आपत्ती होती. अचानक काळाने घाला घालावा आणि आपण पूर्णतः बेसावध असावे असेच काही तरी घडले……. त्यात माझी नोकरी कारागृह विभागातील अत्यंत जबाबदारीच्या आणि संवेदनशील पदावर. काय करावे, कोणती उपाययोजना करावी आणि या महामारीतून आपले कर्मचारी, बंदीजन आणि स्वतः सहित आपले कुटुंब कसे तग धरु, हाच विचार रात्रंदिवस अस्वस्थ करीत होता. मग अशा वेळी काही धाडसी निर्णय स्वतःच्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करुन तर काही शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार घेतले आणि त्याचे नक्कीच नोंद घेण्यासारखे फलित प्राप्त झाले.
येरवडा कारागृह हे राज्यातील सर्वात मोठे, व्यापक आणि अती संवेदनशील कारागृह म्हणून ओळखले जाते. येथील बंदीसंख्या आणि त्यांच्या गुन्ह्यानुसार वर्गवारीची विविधता ही खूप मोठी बाब आहे. परंतू एखाद्या संस्थेचा प्रशासक हा प्रशासकासोबतच तेथील वास्तव्यास असणाऱ्यांचा पालकही असतॊ, हीच भावना ठेवून काही निर्णय त्वरीत घेतले आणि आज अभिमानाने सांगावेसे वाटते की या कोरोना महामारीपासून कारागृहाला सुरक्षित ठेवण्यात मी यशस्वी झालो. त्यापैकी सर्वप्रथम काही कठोर निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली.
१) संपूर्ण कारागृह १०० टक्के लॉकडाऊन (टाळेबंदी) करणारे येरवडा हे भारतातील पहिले कारागृह ठरले व सर्वात उशिरा लॉकडाऊन संपविण्याचा मान देखील याच कारागृहाचा आहे. लॉकडाऊन काळात ड्युटीचे नियोजन करताना यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे २ गट करुन माझ्यासह प्रत्येक गट आळीपाळीने २१ दिवसासाठी स्वतः बंदीजनासोबत कारागृहात २४ तास राहून कर्तव्य दैनंदिन कामकाज व सुरक्षा पाळत आपले कर्तव्य बजावत होता.
२) बंदीजनांच्या कुटुंबियासोबतच्या अधिकृत भेटी /मुलाखती तात्काळ बंद केल्या. जेणेकरुन विषाणूचा संसर्ग थोपविता येईल. या निर्णयाने सुरुवातीला नाराज असणारे आणि विरोध करणाऱ्यांना आता हा निर्णय किती योग्य होता याची प्रचिती आली.
३) दैनंदिन रोटेशन पद्धतीने सरकारी रुग्णालयाच्या मदतीने कर्मचारी व बंद्यांचे स्वॅब तपासणी सुरु केली व बाधितांना त्वरीत विलगीकरणात ठेवले.
४) बाहेरुन नव्याने प्रवेशित होणाऱ्या नवबंद्यांना सक्तीने १४ दिवस विलगीकरणासाठी शासकीय स्वतंत्र जागेचे वसतीगृह उपलब्ध करुन घेतले व नियमित आतील बंद्यापासून त्यांना वेगळे ठेवले. १४ दिवसानंतरच त्यांना मुख्य कारागृहात प्रवेशित केले.
५) नव्याने प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक अरोपीचे स्वॅब टेस्टींग केल्याशिवाय त्यांना तात्पुरत्या कारागृहात प्रवेश नाकारला. यासाठी शासकीय आरोग्य विभाग व पोलिस विभागाचे देखील सहकार्य लाभले.
६) कारागृहात जागोजागी हात धुण्यासाठी स्वतंत्र पाणी व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली. कर्तव्यावर येणाऱ्या आणि आत बाहेर कराव्या लागणाऱ्या लोकांसाठी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था केली.
७) सर्व बंद्यांना रोज रात्री हळदीचे गरम दूध व “क” जीवनसत्त्वाच्या गोळ्यांचा पुरवठा केला.
८) सॅनिटायझर, ऑक्झिमीटर आणि काही होमिओपॅथीच्या गोळ्या अशा गोष्टींची मदत काही स्वयंसेवी संस्थांकडून मिळविली व त्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.
९) कागद/फाईल यांची देवाण घेवाण करताना विषाणूचा प्रसार होवू नये यासाठी कारागृहाबाहेर मंडप घालून छावणी कार्यालय सुरु केले व सर्व पत्रव्यवहार कागद हाताळणी येथूनच केली गेली. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी- कर्मचारी यांचा १ चमू तयार केला. जेणेकरुन आतील लोकांना संसर्ग होवू नये.
१०) या लॉकडाऊन काळात कर्तव्यावर स्वतःला लॉकडाऊन करीत बंदीजनासोबत त्यांना मिळनारे अन्न, नाष्टा, राहाण्याच्या पद्धती, आंघोळीपासून ते असणारे आतील मर्यादित सुविधेसह जीवन आम्ही स्वतः अनुभवले. आम्ही देखील कर्तव्यनिष्ठ होवून कुटुंबापासून बंद्यासाठी हे कर्तव्य करत होतो या भावनेने प्रशासन व बंदी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण झाले व आमच्याविषयी व प्रशासनाविषयी बंद्यांच्या मनात अधिक आदरभाव वाढीस लागला.
११) एका अधिकारी-कर्मचारी गटाची २१ दिवसाची लॉकडाऊन ड्युटी संपताना दुसऱ्या गटाला कर्तव्यासाठी कारागृहात सोडताना त्यांची पूर्ण वैद्यकीय तपासणी करुनच आत प्रवेश दिला गेला.
१२) कारागृहातील बंद्यांना मनोरंजनासाठी असलेल्या रेडिओच्या माध्यमातून सतत कोविड विषयी जनजागॄती करण्यात येत होती. तसेच तज्ञांमार्फत त्यांचे समुपदेशन करण्यात येत होते. बंद्यांना नातेवाईकांसोबतच्या भेटी बंद झाल्याने त्यांची मानसिक अस्वस्थता सांभाळणे खूप जिकीरीचे काम आमच्या टीमने केले.
१३) सर्व अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय सेवक यांचे अमूल्य योगदान आणि माझे नेतृत्व, साहस आणि सर्वांना सोबत घेवून काम करण्याची शैली मला या महामारीपासून कारागृहाला वाचविण्यासाठी उपयुक्त ठरली.
१४) विशेष बाब म्हणजे महिलांसाठी असणाऱ्या स्वतंत्र कारागृहात आज अखेर एकही महिला बंदी कोरोनाबाधित झाली नाही. हे फार मोठे प्रशासनाचे यश म्हणता येईल.
१५) सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेवून देखील या विषाणूने मलाच हेरले व मला कोरोनाची लागण झाली. केवळ १४ दिवसांचे विलगीकरण व औषधोपचार घेवून मी तात्काळ पुन्हा सेवेत रुजू झालो.
अशी आहे माझी, माझ्या नोकरीची, माझ्या संघाची आणि कोरोना महामारी विरुद्ध “येरवडा कारागृह” यांच्यातील संघर्षाची कहाणी.

यु.टी.पवार,
अधीक्षक, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...