पुणे : येमेन सरकार आणि तेथील नागरिक भारत सरकार सोबत वैद्यकीय मदत आणि शिक्षणाच्या दृष्टीने सुदृढ आणि समृद्ध संबंधांकरीता हात पुढे करीत आहेत. येमेन येथे सुरु असलेल्या हल्ल्यांमध्ये जखमी होणा-या नागरिकांना उपचारासाठी सुदान, सौदी, युके आणि भारतात पाठविले जाते. परंतु आता भारतीय डॉक्टरांच्या मदतीने तेथेच हॉस्पिटल सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती येमेनचे राज्यमंत्री हनी अली बेन ब्रेक यांनी पुण्यात एका खासगी दौ-यावर आले असताना दिली.
यावेळी येमेन/अरेबिक विद्यार्थ्यांचे प्रवक्ते फाहद रीदवान अल अख्तरी, हन अली सयादी, येमेन विद्यार्थी संघटना पुणेचे अध्यक्ष अलवान अन नकील, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शोयेब कुरेशी आदी उपस्थित होते.
येमेनचे मंत्री हनी अली बेन ब्रेक म्हणाले, भारतासारख्या सुंदर देशात जिथे अतिथींची सेवा आणि प्रेम हे भारतीयांच्या जगण्याचा अविभाज्य अंग आहे, तेथे येऊन आम्हाला अत्यानंद होत आहे. येमेन आणि भारतातील संबंध अधिकाधिक दृढ व्हावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भारताला जगाच्या नकाशावर अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारतासारख्या संपन्न देशामध्ये जिथे वैद्यकीय आणि शिक्षणाच्या अतिशय चांगल्या सोई आहेत. त्यांनी येमेनमध्ये या दोन्ही क्षेत्रात मदत करावी, अशी विनंती आम्ही करत आहोत. भारत सरकार आणि नागरिकांना शांतता व समृद्धी लाभो. तसेच दोन्ही देशातील संबंध अधिकाधिक सौहार्दाचे व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, भारत सरकारला आम्ही विनंती करतो की त्यांनी शक्य तितकी मदत येमेन सरकार आणि भारतात राहणाºया येमेन नागरिकांना करावी. जेणेकरुन त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही. विशेषत: पुण्याला आॅक्सफर्ड आॅफ दि इस्ट म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पुण्यामध्ये येमेनमधील अनेक विद्यार्थी व नागरिक आहेत. त्यांनाही योग्य ते सहकार्य मिळावे. येमेनमध्ये होणा-या हल्ल्यांत जखमी झालेल्या नागरिकांना उपचारासाठी भारतात पाठविण्यात येणार असून त्याकरीता मेडिकल व्हिसा व इतर सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

