पुणे : आर्थिक विकासाचा मंदावलेला वेग, नफ्याच्या टक्केवारीत झालेली घट अशा अनेक निराशाजनक बाबींचे आव्हान समोर असताना उद्योगांनी काळाच्या गरजेनुसार स्वतःच्या प्रचलित पद्धतींमध्ये बदल करत नवे बदल अंमलात आणले पाहिजेत, असे मत लार्सन अँड टूर्बो कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष दिलीप मंडलिक यांनी व्यक्त केले. ते पुण्यात मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे आयोजित ‘ब्रेकिंग लेगसी’ या विषयावर बोलत होते.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स (एमसीसीसीआयए), नॅशनल इन्स्टिटूयट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम) व इंडियन सोसायटी फॉर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट (आयएसटीडी) एच.आर.फोरम च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुढे बोलताना दिलीप मंडलिक म्हणाले कि, वाढत्या स्पर्धेत उद्योगाला टिकून राहण्यासाठी प्रचलित पद्धती बाजूला ठेवून पुढे येणाऱ्या बदलांचा विचार करून प्रसंगी कठोर निर्णय घेणेही आवश्यक ठरते. याप्रसंगी एनआयपीएमच्यावतीने येत्या २८ व २९ सप्टेंबर २०१८ रोजी पुण्यात होणाऱ्या ‘नॅटकॉन’ या राष्ट्रीय परिषदेविषयी समन्वयक व भारत फोर्ज कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही. भावे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांनी केले. तर आभारप्रदर्शन आयएसटीडीच्या अध्यक्ष रश्मी हेबळकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमला करंदीकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे सुमारे शंभरहुन अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी उपस्थित होते.