पुणे- टिळक स्मारक मंदिर येथे मनोबल हा नित्यानंद पुनर्वसन केंद्राचा जनजागृतीसाठी आयोजित विनामुल्य कार्यक्रम पार पडला. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाद्वारे डॉ. नितीन दलाया (संस्थापक व संचालक, नित्यानंद रिहॉबिलीटेशन सेंटर), डॉ. विद्याधर वाटवे, डॉ. दत्तात्रय ढवळे, डॉ. शिरीषा साठे, डाॅ. अनुराधा करकरे, डाॅ. श्रीरंग उमराणी यांनी चर्चासत्राद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर भाजप अध्यक्ष पुणे जिल्हा योगेश गोगावले यांनी मानसिक समस्या सामाजिक पातळीवर कशा गंभीर पडसाद उठवत आहेत व त्यावर प्रतिबंधक पाऊले उचलण्याची गरज कशी आहे हे सांगितले. यानंतर डॉ. सुप्रिया लोणकर यांनी नित्यानंदच्या पुनर्वसन तत्वांची तसेच उपचारायोग्य वातावरणाची जडणघडण कशी होत गेली याविषयी माहिती “प्रवास नित्यानंदचा” या भाषणद्वारे दिली.
चर्चासत्राच्या सुरुवातीला नित्यानंदमधील मानसशास्त्रज्ञ सायली गोखले यांनी स्किझोफ्रेनिया व व्यसनमुक्ती या आजारांची माहिती दिली व पुनर्वसन उपचारपद्धती नित्यानंद येथे कशी राबवली जाते याचाही आढावा घेतला. या कार्यक्रमात मानसिक आजारांवर औषधोपचार कसे करावेत, त्यात सातत्य कसे राखावे याबद्दल डॉ. दलाया, डॉ. वाटवे तसेच डॉ. ढवळे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रेक्षकांच्या यासंबंधित प्रश्नांना उत्तरेही दिली. समुपदेशन व मनोसामाजिक उपचारांचा (vocational therapy) उपयोग कसा होतो तसेच कुटुंबाची उपचारांमध्ये भूमिका कशी असावी याबद्दल डॉ.शिरीषा साठे यांनी मार्गदर्शन केले.
व्यसनमुक्ती उपचार कसे असतात, त्यांच्यात स्वत: व्यसनाधीन व्यक्तीची उपचार घेण्याकरता इच्छाशक्ती किती महत्वाची असते हे डाॅ. करकरे व डाॅ. उमराणी यांनी सविस्तर उलगडून सांगितले. तसेच व्यसनमुक्ती करता औषधेही उपयुक्त ठरतात हे डॉ. दलायांनी सांगितले. या कार्यक्रमाची आखणी करताना डॉ दलायांचा हेतू असा होता कि गंभीर मानसिक आजारावर माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि त्यांच्या शंकेचे निरसन व्हावे. वेळीच या आजारांची लक्षणे जर जनसामान्यांना ओळखता आली तर ते आजार वाढण्याआधी उपचार करून बऱ्या प्रमाणात बरे होऊ व राहू शकतील. प्रेक्षकांच्या मोठ्या उपस्थितीने व प्रश्नोत्तरांच्या सत्रातील त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला. या कार्यक्रमात जवळपास ५०० प्रेक्षक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात नित्यानंदच्या सिनियर काऊन्सेलर उषा गोखले यांनी मानसिक आजारांवर जसे नित्यानंद पुनर्वसन केंद्राद्वारे काम केले जात आहे तसेच उपचार मानसिक अस्वास्थ्याकरता करता यावे यासाठी नित्यानंद पुढील वर्षाअखेरीस स्वतंत्र दोन ओपीडी सेंटर सुरु करणार येणार आहे अशी माहिती दिली.

