पुणे-सिंहगड रस्ता येथील सनसिटी परिसरातील विकास आराखड्यातील रस्त्यांचा विकास न झाल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील रस्ते विकसित होत नाहीत, तोपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी आज महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
नागपुरे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द, माणिकबाग, सनसिटी हा परिसर १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. २००२ मध्ये या परिसरात महापालिकेने निवडणुकही घेतली आहे. महापालिकेत समावेश झाल्यानंतर या परिसरात वेगाने मोठ्याप्रमाणावर बांधकामे होउन लोकसंख्याही वाढली आहे. परंतू १९ वर्षांनंतरही या परिसरातील विकास आराखड्यातील रस्ते करण्यात आलेले नाहीत. महापालिका केवळ डीपीवरील रस्ते गृहीत धरून बांधकाम परवानगी देत आहे, मात्र रस्त्यांच्या विकसनासाठी प्रयत्न करत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे यापुढील काळात रस्त्यांचा विकास केल्याशिवाय बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

