दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मागणी ची उडविली खिल्ली
नवी दिली -विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी’द काश्मीर फाइल्स’ चित्रपट टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवर आपलं मत व्यक्त केलं. “भाजपचे लोक काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करत आहेत. पण जास्तीत जास्त लोकांनी पाहावा यासाठी तुम्ही मागणी करत असाल तर मग दिग्दर्शकांना चित्रपट थेट यूट्यूबवर टाकायला सांगा तिथं लोकांना एकदम फ्री पाहता येईल”, असा खोचक टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावला. त्यानंतर विधानसभेत एकच हशा पिकला. ‘आप’च्या आमदारांनी बाकं वाजवून केजरीवालांच्या विधानाला प्रतिसाद दिला.
“काश्मीर फाइल्स चित्रपट तुम्ही टॅक्स फ्री करण्याची मागणी का करत आहात? तुम्हाला एवढंच जर वाटत असेल दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना सांगा, ते चित्रपट यूट्यूबवर टाकतील. मग सर्व लोकांना फुकट पाहता येईल. करमुक्त करण्याची गरजच काय?”, असं केजरीवाल म्हणाले. तसंच काश्मिरी पंडितांच्या नावावर कुणीतरी कोट्यवधींची कमाई करत आहे आणि भाजपावाल्यांना त्यांनी चित्रपटाचे पोस्टर लावण्याचं काम दिलं आहे, असाही टोला केजरीवालांनी लगावला.