पुणे: न विचारता पाणीपुरी आणल्यानं पती पत्नीमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेल्यानं पत्नीनं विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रतीक्षा सरवदे असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. तिचा पती गहिनीनाथ सरवदे सध्या पोलिसांच्या अटकेत आहे.
दोन दिवसांपूर्वी गहिनीनाथ यांनी ऑफिसवरून घरी येताना पाणीपुरी पार्सल आणली होती. मला विचारता पाणीपुरी का आणली, असा सवाल करत प्रतीक्षा यांया वादानंतर पुढील दोन दिवस गहिनाथ कामावर जाताना डब्बा घेऊन जात नव्हता. या दोघांमध्ये त्या दोन दिवसात देखील किरकोळ वाद सुरूच होते. यातून प्रतीक्षाने शनिवारी विषारी औषध प्यायले. त्यानंतर प्रतिक्षाला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान प्रतीक्षाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पती गहिनाथला अटक केली असून तपास सुरू असल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले.
गहिनीनाथ सरवदे मूळचा सोलापूरचा असून २०१९ मध्ये त्याचा विवाह प्रतीक्षा सोबत झाला. त्यांना एक मुलगा आहे. गहिनीनाथ उच्चशिक्षित असून एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहे. लग्नानंतर गहिनीनाथ आणि प्रतीक्षा यांच्यात वाद सुरू होते. काही दिवसांपूर्वीच गहिनीनाथ यांनी प्रतीक्षा यांना पुण्यात आणलं होतं. ते दोघे आंबेगाव पठार परिसरात वास्तव्यास होते.सध्या पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

