मुंबई- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले, “आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शिवसेनेचं नेतृत्व त्यांनी केलं, पहिला विधानसभेचा आमदार म्हणून ते निर्वाचित झाले. तत्पूर्वी मुंबई महापालिकेत महापौर बनून या शहराचं नेतृत्व त्यांनी केलं. ज्यांनी काही पार्श्वभूमी नाही. अशी एखादी व्यक्ती महापौर बनते, मुंबई शहरात आपलं प्रस्थ प्रस्थापित करते, विधानसभेत जातात, विरोधी पक्षाचा नेता होतात. राज्याच्या मंत्रीमंडळात जातात आणि संबंध महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम करतात. असं आगळंवेगळं उदाहरण भुजबळांशिवाय दुसरं क्वचितच बघायला मिळेल.”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांचे तोंडभरून कौतुक केले. छगन भुजबळांच्या कार्याबद्दल बोलताना शरद पवारांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे देखील उदाहरण दिले.
महाराष्ट्र सदनाबाबत बोलताना पवार म्हणाले की “दिल्लीत आम्ही लोक राहतो. दिल्लीत सगळ्या राज्य सरकारची निवासस्थानं आहेत आणि सगळ्यात उत्तम निवासस्थान कुणाचं असेल, तर ते महाराष्ट्राचं आहे. लोक म्हणतात हे कोणी केलं, तर ते छगन भुजबळांनी केलं. राज्य सरकारची गुंतवणूक न करता, ही अतिशय उत्तम वास्तू , दिल्लीच्या सौंदर्यात भर टाकेल अशी वास्तू त्यांनी बांधली. अशा अनेक गोष्टी केल्या आहेत. मुंबईमधे, नाशिकमध्ये केल्या आहेत. नाशिकचा चेहरा बदलण्यासाठी त्यांचं प्रचंड योगदान आहे. याची कायमच नोंद राहणार आहे. अशा अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत. एखादं कामी हाती घेतलं तर ते उत्तमच करायचं नेटकंच करायचं आणि त्याचा फायदा लोकांना कायम होईल, याची खबरदारी घ्यायची हे सूत्र घेऊन त्यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा केली. म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलेलो आहोत.”

