४८ तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश
मुंबई-उद्धव ठाकरे परिवाराचे अलिबाग येथील १९ बंगले कुठे गेले? असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत विचारला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी ४८ तासात या प्रकरणी चौकशी अहवाल पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज वसंत स्मृती दादर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
किरीट सोमय्या म्हणाले, मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी घेतलेल्या जागेवर १९ बंगले होते आणि त्यामध्ये घोटाळा झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मान्य केले आहे. हे बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये बांधले. २०१४ मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतही घेतले, त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर झाले. २०२० मध्ये त्यांनी १९ बंगल्यांचा मालमत्ता करही भरला आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढंच नाही तर त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी आणि त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरला आहे. मात्र, आता हे बंगले गायब आहेत. हे बंगले एका रात्रीत कुणी तोडले? कुणी चोरले? तसेच याबाबतचा आदेश कुठल्या अधिकाऱ्याने दिला? बंगले तोडण्याची परवानगी घेतली होती काय? या सगळ्याचा तपास होणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज दिली.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची हातसफाई
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी २०१७ मध्ये शपथपत्रात वरळी येथील गोमातानगर मधील पत्ता दिला आहे. त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गोमाता जनता एसआरए सह. गृह. संस्था वरळीतील सदनिका आणि गाळ्यामध्ये बेकायदेशीर घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. एसारएकडून चौकशीनंतर हे गाळे ४८ तासात खाली करण्याचे आदेश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत. मुंबईतील गरीब झोपडपट्टीवासियांच्या सदनिका महापौर किशोरी पेडणेकर यांनी ढापल्या आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
अनिल परब यांच्या विरोधात लढाई सुरू राहील
पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन करून दापोलीत साई रिसॉर्ट उभारल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची सुनावणी आज झाली. त्याला अनिल परब आणि सदानंद कदम गैरहजर राहिले. त्यांचा
पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. याप्रकरणी पुढेही जोमाने लढाई सुरू राहील असेही ते म्हणाले.

