विटा – शहरांचा भरमसाठ विकास आणि खेडी भकास या धोरणांमुळे एकीकडे पावसात मुंबईचे तीनतेरा वाजले असताना दुसरीकडे पावसाने मारलेली दडी, पिण्याच्या पाण्याची टंचाई अशी दुष्काळी स्थिती असतानाही विटा शहर नजीकच्या खानापूर तालुक्यात ६५ गावांपैकी १२ गावांत एक गाव- एक गणपती संकल्पना राबविली आहे.
खानापूर तालुक्यातील लोकांना सतत दुष्काळी स्थितीला सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने दडी मारली. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या. परंतु मोठे पाणीसाठे होण्याइतपत पाऊस पडला नाही. त्यामुळे खरिपाच्या मशागती, पेरण्या यासह अन्य खर्चाने आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकरी व ग्रामस्थांनी गणपती बाप्पाचे मात्र मोठ्या उत्साहात स्वागत करून प्रतिष्ठापना केली आहे. विटा शहरात २६ सार्वजनिक मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. तर तालुक्यातील ऐनवाडी, पोसेवाडी, धोंडगेवाडी, देवनगर, ढोराळे, सांगोले,सुलतानगादे, करंजे, अडसरवाडी, बाणूरगड, कळंबी, रामनगर या बारा गावांनी एक गाव एक गणपती संकल्पना राबविली आहे. विटा पोलिसांनी तालुक्यातील गावामध्ये जाऊन डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करा, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. त्यानुसार डॉल्बीमुक्त गणेशोत्सव सुरू आहे. काही गणेश मंडळांनी समाज प्रबोधन करणारे जिवंत देखावे उभारले आहेत.

