पुणे – ‘ऑक्स्फर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यासाठी गेल्या १७ फेब्रुवारीचा दिवस ठळक ऐतिहासिक नोंदीचा ठरला. प्रख्यात ‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’तील (स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्क) नेतृत्व संघ आवर्जून येथे दाखल झाला. निमित्त होते पुण्यातील ‘विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये (व्हीआयटी) ‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’च्या सहयोगाने उभारलेल्या ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन एनर्जी स्मार्ट इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स (इएस2) सेंटर’ या आंतरराष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन. हे केंद्र गेल्या तीन वर्षांपासून विकसित केले जात होते.
‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’च्या नेतृत्व संघात प्रा. बाहगत सम्माकिया (व्हाईस प्रेसिडेंट फॉर रिसर्च), प्रा. कृष्णस्वामी श्रीहरी (एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रोव्होस्ट फॉर इंटरनॅशनल इनिशिएटिव्हज् अँड चीफ ग्लोबल अफेअर्स ऑफिसर व डीन, थॉमस जे वॅटसन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड ॲप्लाईड सायन्स), प्रा. पॉल चिरोट (असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग) व एलिझाबेथ क्राजियन (असिस्टंट डीन वॅटसन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड ॲप्लाईड सायन्स) यांचा समावेश होता.
व्हाईस प्रेसिडेंट सम्माकिया व डीन हरी श्रीहरी यांनी ‘व्हीआयटी’चे व्यवस्थापकीय विश्वस्त भरत आगरवाल, उपाध्यक्ष बी. बी. लोहिया, संचालक राजेश जालनेकर, ॲल्युम्नी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स डीन प्रा. सिद्धार्थ जबडे व रिसर्च अँड डेव्हलपमेंट डीन प्रा. मानसी पटवर्धन यांच्यासमवेत या केंद्राचे उद्घाटन केले. केंद्राच्या सदस्य कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. त्यामध्ये ‘सीडॅक’चे डॉ. विकासकुमार, ‘लॉजीकेअर एम्बेडेड सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक चेतन खरे, ‘इनोव्हेटिव्ह टेक्नॉमिक्स प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक संजय भदे यांचा समावेश होता.
याप्रसंगी बोलताना व्हाईस प्रेसिडेंट सम्माकिया म्हणाले, की ‘नॅशनल सायन्स फाऊंडेशन (एनएसएफ) सेंटर फॉर एनर्जी स्मार्ट इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स’ (इएस2) या आंतरराष्ट्रीय केंद्राचे ‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’च्या सहकार्याने पुण्याच्या ‘व्हीआयटी’मध्ये उद्घाटन करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’मधील एनर्जी-स्मार्ट इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्समधील (ईएस2) नॅशनल सायन्स फाऊंडेशन (एनएसएफ) इंडस्ट्री/युनिव्हर्सिटी कोऑपरेशन रिसर्च सेंटर (आय/यूसीआरसी) डाटा सेंटर्ससह इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स कार्यक्षमतेने वापरण्यासाठीच्या प्रक्रिया विकसित करते. उर्जेचा पुरेपूर वापर करण्यासाठी कूलिंग रिसोर्सेसचे नियंत्रण व वर्कलोडचे व्यवस्थापन केले जाते. आय/यूसीआरसी प्रोग्रॅम हा उच्च मान्यताप्राप्त असून अमेरिकेत त्याला प्रतिष्ठा आहे आणि समाजावर सकारात्मक व विशाल परिणाम घडवण्यासाठी शिक्षण व उद्योग या क्षेत्रांतील सहकार्याचा सन १९७३ पासून सुरु असलेला सर्वाधिक यशस्वी कार्यक्रम मानला जातो.
डीन हरी श्रीहरी म्हणाले, की ‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’ व पुण्यातील ‘व्हीआयटी’मध्ये गेल्या सहा वर्षांपासूनचा दीर्घ सहयोग आहे. ही सहयोगात्मक भागीदारी काळाच्या कसोटीवर खरी सिद्ध झाली असून तिचे रुपांतर आता विशाल व सखोल शैक्षणिक नातेसंबंधांत झाले आहे. या केंद्राचे उद्घाटन हा खरोखर आमच्या शैक्षणिक सहकार्यातील मुकूटमणी आहे.
भरत आगरवाल म्हणाले, की उद्योगक्षेत्राला सहकार्य करुन संशोधन करणाऱ्या ‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’शी सहयोगाचा आम्हाला अभिमान वाटतो. याचा फायदा उद्योग व विद्यार्थ्यांना स्वतः अनुभव मिळण्यात होईल. ‘बिंगहॅम्टन’चे आंतरराष्ट्रीय केंद्र अमेरिकेबाहेर स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि या केंद्रामुळे पुणे जागतिक नकाशावर झळकले आहे. पुन्हा पुण्यातही असे प्रथमच घडत आहे, की एक उद्योग-शैक्षणिक संस्था आपल्या पृथ्वीसाठी सर्वोच्च प्राधान्याच्या ऊर्जा बचतीसाठी पर्याय शोधण्यासाठी सहकार्याने काम करत आहे.
या केंद्रासाठी प्रवर्तक प्रारंभिक साह्य ‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’चे माजी विद्यार्थी व ‘अन्वेषक टेक्नॉलॉजी अँड नॉलेज सोल्यूशन्स’चे संस्थापक डॉ. संदीप टोणपी यांनी पुरवले आहे.
यासंदर्भात ‘व्हीआयटी’चे संचालक राजेश जालनेकर म्हणाले, की या सहयोग केंद्राचा उद्देश उद्योगांशी अर्थपूर्ण सहयोग करुन वास्तव जीवनातील समस्यांवर संशोधन करणे व सुनिश्चित वितरण व कालमर्यादेसह पुराव्याधारित सोल्यूशन्स देणे यासाठी एक व्यासपीठ पुरवण्याचा आहे. यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना वास्तव समस्यांवर संशोधनाचा अनोखा अनुभव मिळेल.
‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’ आणि तिच्या भागीदार असलेल्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास’, ‘विलानोव्हा युनिव्हर्सिटी’ व ‘जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ यांनी एनर्जी-स्मार्ट इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स क्षेत्रात या आय/यूसीआरसीची स्थापना केली आहे. एनर्जी-स्मार्ट इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्समधील आय/यूसीआरसी उद्योग व शिक्षण क्षेत्राशी सहकार्याने इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स व कूलिंग उपकरणांना अशा गतिमान स्वयं-शोधक व स्वयं-नियंत्रक प्रणाली बनवण्यासाठी पद्धतशीर प्रक्रिया विकसित करतो, ज्या प्रणाली अनुमानात्मक, स्थिर व तत्काळ ओळखण्याजोग्या असतील. हे केंद्र संगणक शास्त्रज्ञ, यांत्रिकी व विद्युत अभियंत्यांना एका एकात्मिक बहु-शाखीय संघात एकत्र आणून समस्यांवर संशोधन घडवते. फेसबुक, ब्लूम्बर्ग, आयबीएम, कॉम्कास्ट, कॉम्स्कोप, कॉर्निंग, डिग्री कंट्रोल्स, डीव्हीएल, फ्यूचर फॅसिलिटीज, इंटरनॅप, मेस्टेक्स, मायक्रोकूल, पँड्युट, क्वांटाकूल, रॅम्बस, सीलको, स्टील ओआरसीए, ट्रायाड व्हेरिझॉन अशा 20 कंपन्या या केंद्राच्या सदस्य असून त्यांच्या मदतीने ऊर्जा खर्च एक तृतियांशाने कमी करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे.
केंद्राचे सदस्य असलेल्या कंपन्यांना पुढील लाभ मिळतात.
· औद्योगिक भागीदार/मध्यवर्ती सदस्यांना ‘बिंगहॅम्टन युनिव्हर्सिटी’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ॲट अर्लिंग्टन’, ‘विलानोव्हा युनिव्हर्सिटी’ व ‘जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या संपर्क जाळ्यात प्रवेश मिळेल.
· पदवीधर/पीएचडी विद्यार्थी संबंधित भागीदार कंपनीतील निश्चित केलेल्या समस्येवर काम करतील, जेथे ‘बिंगहॅम्टन’ व ‘विश्वकर्मा’ या संस्थांतील शिक्षक भागीदार कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत सहभागी असतील.
· सदस्य कंपनीला वरील विद्यापीठांच्या संपूर्ण संपर्क जाळ्यातील संशोधन, प्रकाशन व सुविधांशी संपर्क मिळेल. प्रकल्पांवर पूर्णवेळ काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्पित सहभागामुळे, संसाधनांच्या वापरामुळे व विद्यापीठांचे शिक्षक व कौशल्यामुळे संशोधन ते फलित यातील कालावधी कमी होईल.