पुणे : ‘इन्व्हेस्ट्रोनॉट’ व ‘विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे (व्हीआयटी) आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट सेंटर (व्ही-इडीसी) यांच्या सहयोगाने पुण्यात येत्या १९ व २० मार्च रोजी ‘इंटर्नशिप मेळा’ या उपक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंटर्नशिप मेळा’ हा पुण्यातील सर्वांत मोठा उमेद्वारी उपक्रम आहे, जो नवउद्योजक (स्टार्ट अप्स) आणि उद्यमशील मनोवृत्तीच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद घडवतो. नवउद्योजकांना या मेळ्यात उद्योगातील साहसवित्त पुरवठादारांकडून (व्हेंचर कॅपिटलिस्ट) निधी मिळवण्याचीही संधी असते. यंदाच्या या मेळ्यात पुण्यातील अभियांत्रिकी, व्यवस्थापन (बीबीए, एमबीए इ.), वाणिज्य, जनसंज्ञापन, कला व अन्य विद्याशाखांतील जवळपास ५००० विद्यार्थी व पदवीधर उमेद्वारी प्राप्त करण्याच्या हेतूने सहभागी होण्याचा अंदाज आहे.
यासंदर्भात ‘विश्वकर्मा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे कार्यकारी संचालक भरत अगरवाल म्हणाले, की ‘इंटर्नशिप मेळा’ हे विद्यार्थी, नवउद्योजक व गुंतवणूकदार यांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. प्रत्येकालाच या उपक्रमातून मोठा फायदा मिळतो. नोकरी व उच्च शिक्षणासाठी तीव्र स्पर्धेच्या आजच्या काळात विद्यार्थ्यांना सुयोग्य अशी उमेद्वारीची संधी मिळते. नवउद्योजकांना पसंतीनुसार उमेद्वारांची निवड करता येते. यातील बहुतेक विद्यार्थी कुशाग्र बुद्धीचे असतात. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या संधी घेण्यासाठी नवउद्योजकांना व विद्यार्थ्यांना भेटता येते आणि विद्यार्थी उद्योजकांना प्रेरणाही देता येते. आम्ही या संपूर्ण सामाजिक परिसंस्थेला उत्तेजन देऊन कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहोत.
‘इन्व्हेस्ट्रोनॉट’च्या सह-संस्थापक दीप्ती वैद्य म्हणाल्या, की रोजगारनिर्मिती व रोजगारक्षमता हे राष्ट्रीय महत्त्वाचे विषय आहेत आणि त्यावरील उपाययोजनेचा भाग बनून उद्योजकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी चालना व साह्य देणे, हे ‘इन्व्हेस्ट्रोनॉट’चे उद्दिष्ट्य आहे.
‘इन्व्हेस्ट्रोनॉट’तर्फे या मेळ्यात सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांसाठी ‘बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन’ ही स्पर्धा घेतली जाणार आहे. त्यातील विजेत्यांना ‘इन्व्हेस्ट्रोनॉट’कडून व्यवसाय सल्ला सेवा पुरवली जाईल आणि ‘व्हीआयटीतर्फे’ही येत्या २० मार्च रोजी होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात या विजेत्यांना मानचिन्ह देऊन गौरवले जाईल. त्यानंतर भोजन होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.
अधिक माहिती अथवा शंकासमाधानासाठी कृपया cofounder@investronaut.com या पत्त्यावर किंवा ८०८७२४०००१ या क्रमांकावर संपर्क साधावा.