पुणे–विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने राजकारणात शोककळा पसरली आहे. आज सकाळी 5.05 च्या दरम्यान मेटे यांच्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. त्यांना नवी मुंबई येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानंतर रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंच्या निधनावर शोक व्यक्त केला. यावेळी काल रात्री विनायक मेटेंनी सव्वादोन वाजता फडणवीसांना मेसेज केला होता, तो आपण आज सकाळी वाचल्याचे फडणवीस म्हणाले.
विनायक मेटेंनी रात्री सव्वादोन वाजता मेसेज पाठवल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली. “काल रात्री सव्वादोन वाजता त्यांनी मला मेसेज केला की ‘मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बैठक बोलावली आहे, त्यासाठी मी येतोय. मी फोन केला तेव्हा तुम्ही फ्लाईटमध्ये होतात. मी सकाळी तुमच्याशी बोलतो’ असे त्या मेसेजमध्ये म्हटले होते. मी आज सकाळी तो मेसेज वाचला”, असे फडणवीस यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
आजचा दिवस दु:खद घटनेने सुरू झाला. सकाळी मला मेसेज आला की अपघात झाला आहे. पण त्यावेळी त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही. मी माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
मेटेंचा मोठा अभ्यास
गरिबीतून वर येऊन स्वत:च्या जिवावर उभे राहिलेले हे नेतृत्व होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मराठा आरक्षणाच्या संदर्भातला त्यांचा मोठा अभ्यास होता. माझे ते अत्यंत जवळचे सहकारी होते. गेली 8-10 वर्ष आम्ही जवळून काम केले, असे फडणवीस यावेळी म्हणाले. अतिशय तळमळीचा नेता होता. कधीही न भरून निघणारी ही पोकळी आहे. त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठिशी आम्ही उभे आहोत. शिवसंग्राम परिवारासाठीही हा मोठा धक्का आहे, असे फडणवीस म्हणाले.