यशवंतराव चव्हाण, शंतनूराव किर्लोस्कर , सुनील दत्त, नर्गीस दत्त पुरस्काराचे वितरण
पुणे :
‘ पुण्याच्या राजकारणात पोकळी आहे . ती भरून काढण्याची इच्छा आहे ,मला लक्ष घालायचे आहे,पण आमच्या पक्षाचे धोरण वेगळे आहे ‘ असे सांगत जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी आज पुण्याच्या अनेक विकासवषयक मुद्द्यांवर मतप्रदर्शन केले .
कृष्णकांत कुदळे पतसंस्था, नर्गिस दत्त महिला पतसंस्था, कृष्णकांत कुदळे फाऊंडेशन यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण, शंतनूराव किर्लोस्कर , सुनील दत्त, नर्गीस दत्त पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी माजी वनमंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या हस्ते ,जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
एसएम जोशी सभागृह येथे हा कार्यक्रम झाला. या वेळी जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे बोलत होते. ७४ व्या वाढदिवसानिमित्त कृष्णकांत कुदळे यांचा सत्कार डॉ.पतंगराव कदम यांच्या हस्ते जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
मामासाहेब खांडगे पतसंस्थेला यशवंतराव चव्हाण पुरस्कार देण्यात आला. गणेश खांडगे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.शंतनुराव किर्लोस्कर पुरस्कार भरत फाटक यांना देण्यात आला. सुनील दत्त पुरस्कार दिव्यांगासाठी कार्यरत रामदास म्हात्रे यांना तर नर्गिस दत्त पुरस्कार उदयोन्मुख कलाकार प्रियांका बर्वे यांना देण्यात आला.
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सौ. मंगल कुदळे, डॉ . सतीश देसाई , अंकुश काकडे , मोहन टिल्लू, रवींद्र दुर्वे , रवी चौधरी उपस्थित होते
‘ कृष्णकांत कुदळे हे मनमिळावू व्यक्तिमत्व असून संस्थात्मक काम त्यांनी केले, मात्र राजकीय कामातून कसलीही अपेक्षा ठेवली नाही. मनाला समाधान हाच निकष ठेऊन ते कार्यरत राहिले’ , असे उदगार डॉ.पतंगराव कदम यांनी काढले
जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे म्हणाले ,’६० वर्षात विकास झाला नव्हता .अनेक घराण्यांनी सत्ता बळकावून ठेवली होती . जनतेला बदल हवा होताच . दुष्काळाचे चित्र बदलत नव्हते . मात्र ,आता जलयुक्त शिवार मुळे तुरीचे विक्रमी उत्पादन होईपर्यंत मजल गाठली आहे . जलयुक्त शिवार ही माझीच संकल्पना आहे . गुंजवणी धरण दीड वर्षात पूर्ण करून आम्ही पुरस्कार मिळवला .पुरंदरचा पाणी प्रश्न सोडवत आणला . पंतप्रधान , मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत ,आणि आशावादी चित्र तयार होत आहे . मात्र ,महाराष्ट्रात योगी स्टाईल काम करून चालणार नाही .
पुण्याच्या प्रश्नाबद्दल बोलताना शिवतारे म्हणाले ,’पुण्याचे पाणी चोरून वापरले जाते . त्यासाठी पुणेकरांच्या पाणी वापराला दोष देण्यात अर्थ नाही . तरीही कमीत कमी पाणी वापर करून पोशिंद्याला ते देण्याची गरज आहे . आपण अधिकृत टॅप देऊन दीडपट रकमेने मीटर देऊन आंबेगाव सारख्या भागात प्रश्न मार्गी लावला . त्या आधी तिथे पैसे घेऊन अनधिकृत पाणी कनेक्शन जोडले जात होते . महापौर मुक्ता टिळक यांचा विरोध असतानाही मी अधिकृत टॅप दिले
उरळीच्या कचरा डेपोमुळे पुढील ३० वर्षे त्या परिसरातील पाणी पिता येणार नाही इतके दूषित झाले आहे . ३० लाख मेट्रिक टन कचरा एकाच ठिकाणी डम्प करण्याचे हे जगातील एकमेव उदाहरण आहे . आम्ही आंदोलन करून कॅपिंग आणि पाणी मंजूर करून घेतले . पण ,कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मित्तीसारखे प्रकल्प परदेशी कंपन्या करायला तयार असूनही हे प्रकल्प आपण घेतले नाहीत .
शिवसेना फक्त मुंबईत लक्ष घालते ,पुण्याकडे त्यांचे लक्ष नाही ,अशी चर्चा होते ,म्हणून मी उद्धव ठाकरे याना निवडणुकीपूर्वी पुण्यातील २०० मान्यवरांबरोबर संवाद कार्यक्रम घेण्याची विनंती केली होती . मी स्वतः पुणे निवडणुकीत लक्ष घालण्यास तयार होतो . मात्र ,पक्षाचे या बाबत धोरण ठरले नाही . पुण्यात आजही कणखर ,खंबीर नेतृत्वाची पोकळी आहे .आणि ती भरून काढली पाहिजे .
राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.प्रा . दादा शिंदे यांनी आभार मानले .

