मुंबई- ‘जलसंवर्धन पंचायत- एक लोकचळवळ’ या अभियानाअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या तीन गावांचा गौरव समारंभ ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलसंवर्धनातील उत्कृष्ट कार्याबद्दल दांडगुरी (जि. रायगड), बाजार वाहेगाव (जि. जालना) आणि मुळेगाव
(जि. नाशिक) या तीन गावांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री श्री. रामदास कदम, राज्याचे मुख्य सचिव श्री. सुमित मल्लिक, ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, आमदार राज पुरोहित, ‘वनराई’चे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया आदी मान्यवर उपस्थित होते. हे पुरस्कार दांडगुरीच्या सरपंच सिद्धीका महाडिक, बाजार वाहेगावचे सरपंच कल्याणराव काळे, मुळेगावच्या सरपंच भीमाबाई सराईत आणि तिन्ही गावाच्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी स्वीकारले.
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ आणि ‘वनराई’ यांच्या संयुक्त सहकार्यातून ‘जल संवर्धन पंचायत- एक लोक चळवळ’ हे अभियान गेल्या वर्षभरापासून राबविण्यात येत आहे. मागील वर्षी पर्यावरण दिनानिमित्त मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला होता. या अभियानाअंतर्गत राज्यातील ६५ गावांमध्ये कोणत्याही शासकीय मदतीविना जलसंवर्धनाची विविध कामे करण्यात आली. या गावांना प्रोत्साहन मिळावे आणि इतर गावांना त्यापासून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने जलसंवर्धनाची सर्वोत्कृष्ट कामे करणार्या पहिल्या तीन गावांना मुख्यमंत्री श्री. देवेद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप होते.

