पुणे- जी. एम. (जनुकीय परिवर्तीत) तंत्रज्ञानामुळे पिकांची उत्पादकता वाढते की नाही हे तपासणे गरजेचे असून, तंत्रज्ञानाचा वापर हा शेतकऱ्यांच्या शाश्वत शेतीसाठी व्हावा असा स्वर ‘बी. टी. बियाणे, जी. एम. (जनुकीय संस्कारित) तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुध्द पर्यावरणाचे धोके व शाश्वत सेंद्रिय शेती’ या विषयावरील परिसंवादात उमटला.
‘वनराई’ आणि ‘फोरम ऑफ इंटेलेकच्युअल्स ’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने बी. टी. बियाणे, जी. एम. (जनुकीय संस्कारित) तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य विरुध्द पर्यावरणाचे धोके व शाश्वत सेंद्रिय शेती’ या वैचारिक द्वंदाविषयी परीसंवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते अजित नरदे यांनी जी. एम. तंत्रज्ञानाची सकारात्मक बाजू मांडली तर जी. एम तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांसंदर्भात ‘धरामित्र’ या पर्यावरण तंत्रज्ञान संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. तारक काटे यांनी आपली बाजू मांडली. फोरम ऑफ इंटलेकच्युअल्स’ चे सतीश देशमुख, कल्पनाताई साळुंखे, पांडुरंग शितोळे, राजीव साने, वसुधा सरदार, गिरधर पाटील तसेच विविध शेतकरी संघटनाचे पदाधिकारी आणि सेंद्रिय शेती क्षेत्रात काम करणार्या वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया हे अध्यक्षस्थानी होते.
भारतामध्ये ‘शेतीसाठी जनुकीय परिवर्तीत तंत्रज्ञान’ हा विषय कायमच वादग्रस्त राहिला आहे. कधी बी. टी. कापूस, तर कधी बी. टी. वांग्याच्या निमित्ताने देशभरात जनुकीय परिवर्तीत (जी. एम.) तंत्रज्ञानासंबंधीच्या निरनिराळ्या वाद-विवादांना उधान आले. जनुकिय परिवर्तीत (जी. एम.) बियाणांच्या चाचण्या खुल्या शेतामध्ये करण्यासंबंधीचा निर्णय शासनाने घ्यावा किंवा नाही, हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऐरणीवर येत आहे. जनुकिय परिवर्तीत (जी. एम.) बियाणांच्या चाचण्या खुल्या शेतामध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेऊ नये, यासाठी काही तज्ञ व्यक्ती, संस्था- संघटना तीव्र विरोध दर्शवित आहेत, तर काही तज्ञ व संस्था या निर्णयाचे आणि जी. एम. तंत्रज्ञानाचे समर्थन करीत आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये याविषयी एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकरी व सर्वसामान्यांमधील हा संभ्रम दूर व्हावा आणि या विषयाच्या परस्परविरोधी दोन्ही बाजूंवर सखोल विचारमंथन घडवून आणावे या उद्देशाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
अजित नरदे म्हणाले, जनुकिय परिवर्तीत (जी. एम.) तंत्रज्ञानामुळे पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला व पिकांची उत्पादकता वाढली आहे. संकरीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या, वेगवेगळे वान निर्माण केले त्यामुळे उत्पादकता वाढली. दर एकरी धान्याचे उत्पादन वाढण्यासाठी किटकनाशकांचा शोध लागला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशाची लोकसंख्या ४० कोटी होती. त्याकाळात सेंद्रिय शेती होती. त्यातून १०० टक्के जनतेला धान्य मिळत नव्हते त्यामुळे आपल्याला मिलो सारखा गहू आयात करण्याची वेळ आली. देशातील शेती सेंद्रिय शेतीवरच केली असती तर देशातील जनता उपाशी राहिली असती. बी. टी. कॉटनचे बियाणे येण्याअगोदर बोंडआळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी मेटाकुटीस आला होता. त्याला वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या १३ फवारण्या कराव्या लागत असत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढायचा. मात्र, तरीही बोंडआळीचे नियंत्रण होत नव्हते. बी. टी. कॉटनमुळे केवळ ३ औषधांच्या फवारण्या कराव्या लागतात तसेच बोंडआळीवर पूर्णपणे नियंत्रण आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकरी उत्पादकता वाढली आहे व खर्चातही कपात झाली आहे. या तंत्रज्ञानाला गांधीवाद्यांचा, डाव्यांचा विरोध असतानाही सरकारने परवानगी दिली. जनुकिय परिवर्तीत (जी. एम.) तंत्रज्ञानामुळे बोंडआळी मरते म्हणजे ते विषारी आहे, माणसांसाठी व जनावरांसाठी अपायकारक आहे असा प्रचार केला गेला. परंतु माणसांना व जनावरांना कुठलाही प्रादुर्भाव होत नाही हे सिध्द झाले आहे. ९७ टक्के शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून जनुकिय परिवर्तीत (जी. एम.) तंत्रज्ञानाबद्दलचा संभ्रम दूर होणे आवश्यक आहे असे नरदे यांनी सांगितले.
जनुकिय परिवर्तीत (जी. एम.) तंत्रज्ञानामुळे उत्पाकता वाढली आहे. खर्चात कपात झाली आहे हे सर्सामान्य शेतकरी सांगत असताना या तंत्रज्ञानामुळे उत्पाकता वाढ होते की नाही हा वादाचा विषयच होऊ शकत नाही असेही ते म्हणाले.
डॉ. तारक काटे म्हणाले, की कुठल्याही तंत्रज्ञांनाचा स्वीकार करताना तात्कालिक व शाश्वत तसेच वैयक्तिक की सामायिक लाभ मिळणार याचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचा जीवसरूष्टीवर, समाज, आरोग्य, अर्थकारणावर कोणते दूरगामी परिणाम होतील याचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच हवामानातील बदलांच्या अनुषंगाने पिकाच्या जाती, विविध वाणांची विविधता टिकून राहणे आवश्यक आहे. या सर्वांना नवीन तंत्रज्ञान पर्याय आहे का याचा विचार होणे आवश्यक आहे.
जनुकिय परिवर्तीत (जी. एम.) तंत्रज्ञानामध्ये एका ठिकाणचे जनुकं काढून ते दुसऱ्या वनस्पतीमध्ये अथवा प्राण्यामध्ये घातले जाते. परंतु नेमके ते एकच जनुकं येते की त्याबरोबर दुसरेही जनुके येतात याबाबत अद्याप खात्री नाही. बोंडआळी मारण्यासाठी वापरण्यात येणार्या तंत्रज्ञानामुळे केवळ एक गुणधर्म नियंत्रित होत नाही तर अनेक गुणधर्म नियंत्रित होऊ शकतात. त्याचे धोके अधिक आहेत. मात्र, त्याचा निर्णय ज्याचा त्याला घ्यायचा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.
जनुकिय परिवर्तीत (जी. एम.) तंत्रज्ञांनामुळे दूरगामी व व्यापक परिणामांची संभाव्यता अधिक आहे, याचे परिणाम हे अपरिवर्तनीय आहेत, या तंत्रज्ञानामुळे अनियंत्रीत कीड, उपयुक्त कीटकांना व जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच जनावरे, पशु, पक्षी यांनाही धोका निर्माण होऊ शकतो. पिकांच्या रानटी जाती नष्ट होण्याची भीती असून हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकांच्या नवीन जाती निर्माण करण्यासाठी रानटी जातींची आवश्यकता आहे. बी. टी.कॉटनमुळे उत्पादकता वाढली हे सांगितले जाते, मात्र, शेतकर्यांनी इतर पिकांच्या क्षेत्रावर बी. टी. कॉटनचे पिक घेतले. एकरी उत्पादनात वाढ झली नाही असे सांगून शेतकऱ्यांच्या हितासाठी खरच हे तंत्रज्ञान उपयोगी आहे का आणि उत्पादकता वाढली आहे का हे तपासून पाहण्याची गरज आहे असे डॉ. काटे म्हणाले. आजवरच्या सर्वच सरकारांचे धोरण शेती व शेतकर्यासाठी मारक ठरले असल्याचे दोन्हीही वक्त्यांनी नमूद केले. वनराईचे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया यांनी दोन्ही बाजूंचा सखोल विचार करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश देशमुख यांनी केले, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमित वाडेकर यांनी केले.