पुणे— स्व. मोहन धारिया यांनी वनराईच्या माध्यमातून राबविलेल्या विविध योजना शासनाने राबविल्या असे
गौरोद्गार पुणे महापालिकेचे माजी उद्यान अधीक्षक यशवंत खैरे यांनी काढले.
वनराई’चे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ‘वनराई’ची विकास
कामे सुरु असलेल्या विविध गावांमध्ये ‘जल-वन मोहनदिन' साजरा करण्यात आला. पुण्यामध्ये बॉटल गार्डनिंग स्पर्धा
व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध शाळांनी सहभाग घेतला होता. त्याचा बक्षीस वितरण
करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतीला समर्पित फेब्रुवारी महिन्याचा वनराई
अंकाचे प्रकाशन जेष्ठ समाजसेविका श्रीमती सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. जेष्ठ वृक्षप्रेमी
सुरेश पिंगळे, डॉ. सुरेश तलाठी, अरुण गांधी, वनराईचे वित्तविभाग प्रमुख सुधीर मेकल, वनराई अंकाचे संपादक
अमित वाडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
खैरे म्हणाले, फेकून दिलेल्या वस्तूंपासून वनस्पती आणि भाजीपाला तयार करण्याचा उपक्रम या स्पर्धेद्वारा घेण्यात
आला तो उल्लेखनीय आहे. आता तंत्रज्ञानाचा वापर करून टेरेसवर कुटुंबाला पुरेल इतका भाजीपाला आपण घेऊ
शकतो. तंत्रज्ञान व कृषी एकत्र आल्यामुळे आपण लोकसंख्या वाढत असतानाही सर्वांना पुरेल इतका अन्नधान्याचे
उत्पादन करू शकतो. स्व. मोहन धारिया यांनीही तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागात व शहरी भागात विविध
योजना राबविल्या. पुणे शहरात त्यांनी ‘अर्बन फॉरेस्ट’ ही संकल्पना राबविली. आता त्यांची ही संकल्पना सरकार
सरकारचे धोरण म्हणून राबवीत आहे. वनराई बंधारे व इतर त्यांच्या योजनाही शासन राबवीत आहे. राजकारण
सोडून स्वयंसेवी संस्था सुरु करून ती शेवटपर्यंत सुरु ठेवणारे मोहन धारिया हे देशातील एकमेव उदाहरण आहे असे
गौरोद्गारही त्यांनी काढले.
सुरेश पिंगळे म्हणाले, स्व. मोहन धारिया यांनी सत्याग्रह केला म्हणून एम्प्रेस गार्डन मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध
करून देण्यात आले. स्व. मोहन धारिया यांच्यासारख्या मोठ्या माणसांचा सहवास हा आपल्या जीवनाला उजाळा
देऊन जातो असे गौरोद्गरही त्यांनी काढले.
सुमनताई किर्लोस्कर म्हणाल्या, लहान वयात मुलांना दैनदिन जीवनात जी गरजेची वस्तू आहे ती कशी तयार होते
ते या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना शिकायला मिळाले. अशा उपक्रमांना समाजाच्या सर्व थरातून पाठींबा मिळतो.
अशी पिढी तयार होणे हे देशाचे भवितव्य उज्वल असल्याचे द्योतक आहे.
रवींद्र धारिया म्हणाले, बॉटल गार्डनिंग हा स्व. मोहन धारिया यांचा आवडीचा विषय होता. त्याची व्याप्ती कशी
वाढवता येईल याचा विचार करून हा उपक्रम शाळांमध्ये सुरु करण्यात आला. पुढच्या वर्षी १०० शाळांमध्ये हा
उपक्रम राबविला जाईल. वनराईचे १९ जिल्ह्यात कार्य सुरु असून आज रत्नागिरी, नाशिक अशा विविध ठिकाणी
मुलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
डॉ. सुरेश तलाठी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ. मोहन धारिया यांच्या ९२ व्या जयंतीचे औचित्य साधून आज(दि. १४ फेब्रुवारी) रायगड जिल्ह्यातील महाड व
श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर व देवरूख, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व दौंड, जालना जिल्ह्यातील बदनापूर
आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वदर इत्यादी तालुक्यांमधील विविध गावांमध्ये वनराईचे कार्यकर्ते, गावकरी,
स्थानिक पाणलोट समितीचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी, स्थानिक विविध प्रशासकीय अधिकारी यांच्या
सहभागातून स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले, तसेच ग्राम स्वच्छता, प्रभात फेरी, वृक्षारोपण यांसारखे असे
विविध उपक्रमही राबविण्यात आले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल परिसरात ई-वेस्ट संकलनासाठी उपयोगी असणाऱ्या ‘ई-वेस्ट बिन’ या कंटेनरचे
आणि प्लास्टिक कचरा संकलनासाठीच्या पिशव्यांचे लोकार्पण करण्यात आले, तसेच हॉस्पिटलच्या परिसरात स्वच्छता
मोहिमेचे आयोजनही करण्यात आले. यावेळी वनराईचे अध्यक्ष श्री. रवींद्र धारिया, वित्त विभागप्रमुख श्री. सुधीर मेकल,
व्यवस्थापकीय सल्लागार श्री. धन्यकुमार चोरडिया, प्रकल्प संचालक श्री. प्रकाश जगताप, प्रशासकीय व्यवस्थापक श्री.
मुकुंद शिंदे, वनराईचे कार्यकारी संपादक श्री. अमित वाडेकर, ई-वेस्ट तज्ज्ञ श्री. विनित बियाणी, ‘क्लीन गारबेज’चे श्री.
ललीत राठी, हास्यकलाकार मकरंद टिल्लू, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे श्री. सचिन व्यवहारे, हाऊसकिपिंग
विभागाच्या प्रिया जोशी आदी उपस्थित होते.
वनराई कार्यालय आवारात शालेय विद्यार्थ्यांकरिता ‘बॉटल गार्डनिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये
प्लास्टिकच्या बाटल्या, सलाईनच्या वायर्स, वाया गेलेल्या सीडीज् अशा विविध प्लास्टिक आणि ई-वेस्टचा वापर करून
पालक, मेथी, कांदे अशा प्रकारचा भाजीपाला, पुदीना, तुळशीसारखी रोपे आदींची लागवड विद्यार्थ्यांनी केली. स्पर्धेतील
विजेत्या शाळांना रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्रक देण्यात आले, तसेच या बॉटल गार्डनिंगचे प्रदर्शन ठेवण्यात आले.
या स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, डी. ई. एस. सेंकडरी इंग्लिश प्रायमरी स्कूल टिळक रोड आणि शेठ आर.
एन. शहा इंग्रजी माध्यमिक प्रायमरी स्कू्ल, कसबा पेठ या तीन शाळांना अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसरऱ्या
क्रमांकाचे पारितोषिके मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी केले तर आभार अमित वाडेकर यांनी मानले.