पुणे-‘वनराई’चे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांचा जन्मदिवस
‘जल-वन मोहन’दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. यंदा त्यांची 92 वी जयंती असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 14 फेब्रुवारी, 2017 रोजी वनराई कार्यालयाच्या आवारात सायं. 4.30 वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
‘जल-वन-मोहन’ दिनानिमित्त पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल परिसरात सकाळी 10 वाजता प्लास्टिक व ई-वेस्ट संकलनासाठी उपयोगी पडू शकतील अशा विशेष पिशव्यांचे (बॅग्ज) लोकार्पण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येणार असून, वनराई संस्थेचे विविध पदाधिकारी तसेच हॉस्पिटलचे अधिकारी-कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.
शालेय विद्यार्थ्यांकरिता ‘बॉटल गार्डनिंग’ स्पर्धा व प्रदर्शना’चे आयोजनही करण्यात आलेले आहे. प्लास्टिकच्या जुन्या टाक्या, वापरलेले पत्र्याचे डबे, काचेच्या बाटल्या आणि ओला कचरा इत्यादी टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करून भाजीपाला, फुलझाडे आदींची लागवड करण्याची ही आगळीवेगळी स्पर्धा आहे. या स्पर्धेतून उद्याचे नागरिक असलेले आजचे शालेय विद्यार्थी वृक्षसंवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापनाप्रती संवेदनशील आणि कृतिशील व्हावेत आणि त्यांच्या मनावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कारही रुजावेत, हा यामागचा उद्देश आहे. या स्पर्धेतील विजेत्या शालेय विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.
याबरोबरच डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतींना समर्पित ‘वनराई’ अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती सुमनताई किर्लोस्कर यांच्या हस्ते होणार असून, बॉटल गार्डनिंगच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ वृक्षप्रेमी श्री. सुरेश पिंगळे यांच्या हस्ते आणि पारितोषिक वितरण पुणे महापालिकेचे माजी उद्यान अधीक्षक श्री. यशवंत खैरे यांच्या हस्ते होणार आहे.